

रोह्यात अतिक्रमणावर कारवाई
रोहा नगरपालिकेची धडक मोहीम;
रोहा, ता. १० (बातमीदार) : रोहा शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाय म्हणून नगरपालिकेने अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम सुरू केली असून, शुक्रवारी करण्यात आलेल्या कारवाईत रोहा अर्बन बँक ते पोस्ट ऑफिस दरम्यान मुख्य नाल्यावर झालेले अतिक्रमण हटविण्यात आले. या कारवाईमुळे तब्बल १२ वर्षांपासून बंदिस्त असलेल्या नैसर्गिक नाल्याला मोकळा श्वास मिळाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
नगराध्यक्षा वनश्री समीर शेडगे यांच्या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया वेगात राबवली. शहरातील अरुंद रस्ते आणि वाढती वाहतूक लक्षात घेता रस्ते रुंदीकरणासाठी अतिक्रमण दूर करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार संबंधितांना पूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या कारवाईत पोस्ट ऑफिसकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील भव्य इमारतीने नैसर्गिक नाल्यावर केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. या नाल्यामुळे पावसाळ्यात पाणी निचरा होण्यास मोठी मदत होणार आहे. कारवाईदरम्यान मुख्याधिकारी अजयकुमार एडके, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष अहमद दर्जी, बांधकाम सभापती राजेंद्र जैन, नीता हजारे, गटनेते महेंद्र गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.
या कारवाईनंतर तीनबत्ती नाका परिसरातही पाहणी करण्यात आली असून, तेथील अतिक्रमण हटविण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. अतिक्रमण हटविताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे आश्वासन नगराध्यक्षा शेडगे यांनी दिले.
ज्यांना नोटीस देण्यात आली आहे, त्यांनी स्वतःहून अतिक्रमण दूर करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी केले आहे.
चौकट
धोकादायक इमारतींवर कारवाई कधी?
शहरातील अनेक जीर्ण व धोकादायक इमारतींना नोटिसा देऊनही त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाळ्यापूर्वी अशा इमारती हटविणे अत्यावश्यक असताना केवळ नोटिसांपुरतीच कारवाई मर्यादित राहिल्याने भविष्यात दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
फोटो कॅप्शन : रोहे शहरातील मुख्य नाल्यावरील अतिक्रमण दूर करण्याची कारवाई प्रसंगी मुख्याधिकारी अजयकुमार एडके, नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपाध्यक्ष अहमद दर्जी व अन्य मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.