कावळे येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन

कावळे येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन
Published on

कावळे येथे बंधाऱ्याचे भूमिपूजन
शेती व जलसंधारणाला मिळणार चालना

विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील मौजे कावळे येथे जलसंधारण व शेती विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात व पारंपरिक वातावरणात पार पडले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट, रोटरी क्लब ऑफ ब्रिजपोर्ट (अमेरिका), रोटरी क्लब ऑफ बॉम्बे महाकाली हाइट्स अंधेरी, इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट, रुस्तूमजी ग्रुप, आरसीसी वाडा वीर तसेच उजागर सेवार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे आगमन आदिवासी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या सांबळ वाद्यांच्या गजरात करण्यात आले. पारंपरिक ढोल-ताशांच्या निनादात झालेल्या स्वागतामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमस्थळी आगमनानंतर उपस्थित मान्यवरांनी सरस्वती माता व बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप हडबाळ यांनी करताना बंधाऱ्याच्या उभारणीमागील उद्देश व गावाच्या सर्वांगीण विकासातील त्याचे महत्त्व अधोरेखित केले. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्टच्या अध्यक्षा प्रज्ञा मेहता यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी अशा प्रकल्पांची गरज व्यक्त केली. चेक डॅम डायरेक्टर राहुल पटेल यांनी बंधाऱ्यामुळे भूजल पातळी वाढून शेतीस मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.

रोटरी क्लब ऑफ बॉम्बे महाकाली हाइट्स अंधेरीचे उपाध्यक्ष सुनील आनंद यांनी मार्गदर्शन करताना जलसंधारणाच्या उपक्रमांमध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभाग घेण्याचे आवाहन केले. इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट तसेच रुस्तूमजी ग्रुपच्या प्रतिनिधींनीही आपल्या मनोगतातून बंधाऱ्यामुळे गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती मिळणार असल्याचे स्पष्ट केले.
या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून, त्यामुळे दुबार व तिबार पीक घेणे शक्य होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. याशिवाय माती धूप होण्यावर नियंत्रण मिळेल, भूजल साठ्यात वाढ होईल तसेच जनावरांसाठीही पाण्याची उपलब्धता निर्माण होणार आहे. बंधाऱ्यामुळे परिसरात हरित वातावरण तयार होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होणार आहे.

यानंतर सर्व मान्यवरांनी नदीपात्रात जाऊन विधीपूर्वक श्रीफळ फोडून बंधाऱ्याचे भूमिपूजन केले. याप्रसंगी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी, दानशूर व्यक्ती व कार्यकर्त्यांचे आभार संदीप भोये, सूरज भुसारा व प्रतीक पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पठारे यांनी केले, तर आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com