

म्हाडाचा पुनर्विकासाचा धडाका
वरळी, वांद्रे, अंधेरीत प्रकल्प; विकसक नियुक्तीची प्रक्रिया सुरू
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वांद्रे रिक्लेमेशन, वरळी येथील आदर्शनगर आणि अंधेरीच्या सरदार वल्लभभाई पटेल (एसपीव्ही)नगरच्या सुमारे २०० एकरावरील इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार आहे. म्हाडाचा लेआऊट असलेल्या या तिन्ही ठिकाणांच्या भूखंडावरील इमारतींचा समूह पुनर्विकासाचा आराखडा म्हाडाने तयार केला आहे. आता बांधकाम आणि विकास संस्थेच्या (सी ॲण्ड डीए) नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. निविदेनुसार येथील रहिवाशांना ८०० ते २,१९० चाैरस फुटांची घरे मिळणार आहेत.
वांद्रे रिक्लेमेशन परिसरात १,९७,४६६ चौरस मीटरचा (९८ एकर) भूखंड आहे. त्यावर १,१४७ घरे आहेत. आदर्शनगरचे ६८,०३४ चौरस मीटर (१७ एकर) क्षेत्र असून ८६३ घरे आहेत, तर सरदार वल्लभभाई पटेलनगर (अंधेरी पश्चिम) सुमारे ७० एकराचे क्षेत्र असून तेथे ४,९७३ घरे आहेत. या ठिकाणी समूह पुनर्विकासाला राज्य सरकारने मंजुरी दिल्यानंतर म्हाडाने आराखडा तयार करून उच्चाधिकार समितीला सादर केला होता. त्यानुसार नुकत्याच झालेल्या समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर म्हाडाने बांधकाम आणि विकास संस्थेच्य नियुक्तीसाठी ११ जूनपर्यंत निविदा मागवल्या आहेत. संबंधित रहिवाशांना निविदांत नमूद केलेले किमान क्षेत्रफळ आणि अन्य लाभ देणे बंधनकारक असणार आहे.
रहिवाशांना काय मिळणार?
आदर्शनगर, वरळी
- एकूण घरे : ८६३
- सध्याचे क्षेत्रफळ : २५०-८०० चौरस फूट
- पुनर्विकासानंतर मिळणारे क्षेत्रफळ : ८००-२००० चौरस फूट
- काॅर्पस फंड : १८-४५ लाख रुपये
- प्रस्तावित मासिक भाडे : ३५-८५ हजार रुपये
----
एसव्हीपीनगर, अंधेरी
- एकूण घरे : ४,९७३
- सध्याचे क्षेत्रफळ : २००-८०० चौरस फूट
- पुनर्विकासानंतर क्षेत्रफळ : ६००-२,१२० चौरस फूट
- काॅर्पस फंड : २.५-१४ लाख रुपये
- प्रस्तावित मासिक भाडे : २०-८५ हजार रुपये
-----
वांद्रे रिक्लेमेशन
- एकूण घरे : १,१४७
- सध्याचे क्षेत्रफळ : ३००-८०० चौरस फूट
- पुनर्विकासानंतर क्षेत्रफळ : ८००-२,१९० चौरस फूट
- काॅर्पस फंड : १७-४० लाख रुपये
- प्रस्तावित मासिक भाडे : ४५ हजार ते एक लाख रुपये
------
म्हाडाला काय मिळणार?
- आदर्शनगर, वरळी : २३,२८१ चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ किंवा ७६८ कोटी प्रीमियम मिळेल
- वांद्रे रिक्लेमेशन : ६१,४९८ चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ किंवा १,८१७ कोटी रुपये प्रीमियम
- एसव्हीपीनगर, अंधेरी : ७४,७६० चौरस मीटर बांधीव क्षेत्रफळ
----------------