

ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : दिल्ली कॅपिटल आणि गुजरात टायटन या क्रिकेट सामन्याच्या ऑनलाइन क्रिकेट बेटिंगचा पर्दाफाश पोलिसांकडून नुकताच करण्यात आला. आनंद वासुदेव दियालानी (३७) आणि भारत कृष्णा सोनावणे (४१) या दोघांना ठाणे शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे कक्षाने ताब्यात घेत त्यांच्याकडून मोबाईल, टॅब आणि इतर साहित्य जप्त केले.
वागळे इस्टेट येथील तीन हात नाका परिसरात ऑनलाइन क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती मालमत्ता गुन्हे कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ घार्गे यांच्या पथकाने बुधवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास इंटरनिटी मॉल, तीनहात नाका येथील द प्रॉपर्टी स्टोअर या कार्यालयावर छापा टाकला. तेथे अटकेतील दोघे ऑनलाइन संकेतस्थळाच्या मदतीने क्रिकेट बेटिंग करीत असल्याचे आढळून आले. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यावर बेटिंग सुरू होते. सुमारे १४.९९ लाख रुपयांची व्यवहाराची नोंदही सापडली. तसेच व्हॉट्सअॅप संभाषणाद्वारे बेटिंग आयडी पुरवठ्याचे पुरावे मिळाले. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.