

गुटखा नष्ट केल्यानंतर पुन्हा धाडसी चोरी
अन्न औषध प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
भिवंडी, ता. ११ (वार्ताहर) ः भिवंडी शहरातील कचरा चाविंद्रा येथील डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येतो. येथे पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाकडून जप्त केलेला गुटखा नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. जप्त केलेला ६४ लाखांचा गुटखा पुन्हा गुटखा माफियांकडून खड्ड्यातून चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही सर्व घटना तेथील स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणली; पण अद्याप संबंधित विभागाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी भिवंडी गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत सुमारे ६४ लाखांचा गुटखा जप्त केला होता. न्यायालयाच्या परवानगीनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा गुटखा चाविंद्रा डम्पिंग ग्राउंड येथे वीस ते पंचवीस फूट खोल खड्ड्यात गाडून नष्ट करण्याची कारवाई शुक्रवारी (ता. १०) दुपारच्या सुमारास करण्यात आली; मात्र ही प्रक्रिया पूर्ण होताच गुटखा माफियांकडून त्याच मध्यरात्री जेसीबीच्या मदतीने खड्डा उकरून मोठ्या प्रमाणात गुटखा पुन्हा बाहेर काढला आणि टेम्पोमध्ये भरून नेण्यात आला.
स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत गुटखा माफियांना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिस येत असल्याचे कळताच गुटख्याने भरलेला टेम्पो सोडून गुटखा माफिया त्या ठिकाणाहून पसार झाले.
---------------------------
न्यायालयाच्या आदेशानुसार प्रक्रिया नाही
न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करून जप्त केलेला गुटखा पूर्ण नष्ट करण्याची प्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यासाठी अशा पद्धतीने जप्त केलेला गुटखा नष्ट करताना त्यावर केमिकल टाकून जाळणे आवश्यक आहे; परंतु तसे न केल्याने गुटखा माफिया याचा फायदा उचलतात, असा आरोप नगरसेवक रोहिदास वाघमारे यांनी केला आहे. अशा प्रकारे नष्ट केलेला गुटखा पुन्हा बाहेर काढून नेण्यामागे मोठे रॅकेट कार्यरत असून यामध्ये काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याचा आरोप माजी नगरसेवक विकास निकम यांनी केला आहे.
-----------------------
कारवाईची प्रतीक्षा
पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईवर या सर्व गदारोळानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. राज्यात गुटखा बंदी असताना कारवाई केलेला गुटखा पुन्हा बाहेर काढण्यासाठी गुटखा माफिया सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधितांवर आणि गुटखा माफियांवर कारवाई होणार का, असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात डम्पिंग ग्राउंड परिसरातील पोलिस ठाणे हद्दीत या घटनेबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.