

तत्काळ निवाऱ्याची व्यवस्था करा!
अंबरनाथ सीमेवरील बाधितांसाठी खा. शिंदेंचा पुढाकार
उल्हासनगर, ता. ११ (वार्ताहर) : उल्हासनगर व अंबरनाथ सीमेवर असलेल्या प्राचीन शिवमंदिर परिसरात काही दिवसांपूर्वी अनधिकृत बांधकमांवर कारवाई करण्यात आली होती. त्या वेळी झालेल्या या कारवाईमुळे २५ ते ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या ३१ घरांतील नागरिकांना काही दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्यास राहावे लागले. आता या प्रकरणात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. पुनर्वसनाची जबाबदारी प्रशासनाची असली तरी नागरिकांना बेघर ठेवणे अजिबात सहन केले जाणार नाही, असे सांगत त्यांनी अंबरनाथ नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तत्काळ पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था करण्यास सांगितले.
शिवमंदिर विकास प्रकल्पाच्या नावाखाली तीन दशकांपासून राहणाऱ्या नागरिकांना विस्थापित करण्याच्या हालचालींना विरोधाची धार चढली असतानाच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे आता या प्रश्नाला निर्णायक वळण मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बाधित झालेल्या एकाही कुटुंबाला बेघर होऊ देणार नाही, असा ठाम इशारा देत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रशासनाला थेट सुनावले आहे. हा विकास प्रकल्प १०० टक्के शासकीय निधीतून राबवण्यात येत असून, त्याच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. मात्र संबंधित घरांतील रहिवाशांनी पुनर्वसन किंवा योग्य मोबदल्याशिवाय जागा रिकामी करण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे प्रकल्प अडचणीत सापडला आहे. नागरिकांच्या पुनर्वसनाला प्राधान्य देत प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न होणार असल्याने आता येत्या काही दिवसांत या प्रश्नावर ठोस तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------
जबाबदारीवरून संभ्रम
उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगर परिषद यांच्यात जबाबदारीवरून संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी सांगितले, की संबंधित नागरिक उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत येतात. त्यामुळे त्यांच्या पात्रतेची पडताळणी करून अधिकृत यादी देणे ही उल्हासनगर महापालिकेची जबाबदारी आहे. ती यादी मिळाल्यानंतरच पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.