

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक
मुख्य आरोपी फरार, गुंतवणूकदारांचा संताप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळेल, असे प्रलोभन दाखवून तब्बल १,२४६ गुंतवणूकदारांची सुमारे १८५ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणात सचिन बाळकृष्ण राणे आणि सागर करिवडेकर यांच्याविरुद्ध ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने २५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, दोघेही आरोपी सध्या फरार आहेत. विशेष म्हणजे, गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे हिच्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषद घेत या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. त्यांनी सांगितले की, ठाण्यातील श्रीजी विले को-ऑप. सोसायटी परिसरात सचिन राणे आणि त्यांची पत्नी प्रीती राणे यांनी शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. गुंतवणूकदारांना दरमहा चार ते पाच टक्के परतावा मिळेल, असे प्रलोभन दाखवून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले. गुंतवलेली रक्कम सागर करिवडेकरच्या खात्यात जमा करण्यास सांगण्यात येत असे. विश्वास निर्माण करण्यासाठी करिवडेकरसोबत सामंजस्य करार करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी ‘मार्गदर्शक’ म्हणून स्वाक्षरी केली होती. यानंतर या पैशांचा मोठा हिस्सा आरोपींच्या नातेवाइकांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचा आरोप आहे.
मनोज प्रधान यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली असून, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी कठोर कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच, नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.
कुणाच्या खात्यात किती रक्कम?
मोरे कुटुंब (प्रीती राणेचे नातेवाईक) ८.५९ कोटी रुपये, कुडतरकर कुटुंब (सचिन राणेची बहीण सरोज) ४.५६ कोटी रुपये, राणे कुटुंब १५.५५ कोटी रुपये, इतर व्यक्ती तन्वी सुर्वे ६३.१७ लाख रुपये, श्रेयस केरकर २.९७ कोटी रुपये असे एकूण सुमारे ३२ कोटी रुपये विविध नातेवाइकांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याची माहिती मनोज प्रधान यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.