दंडाच्या जाचात ठाणे विभागातील एसटी चालक

दंडाच्या जाचात ठाणे विभागातील एसटी चालक
Published on

दंडाच्या जाचात ठाणे विभागातील एसटी चालक
पगारातून लाखोंची कपात; न्यायासाठी आता नितीन गडकरींकडे धाव
ठाणे शहर, ता. १२ (बातमीदार) ः ठाणे विभागातील एसटीचालक दंडाच्या संकटात सापडले आहेत. त्यांच्या पगारातून लाखो रुपयांची कपात होत आहे. दंडाची रक्कम एसटी महामंडळाकडून भरणे अपेक्षित असताना ती चालकांच्या पगारातून परस्पर कापून घेतली जात आहे. या जाचातून सुटका व्हावी, यासाठी चालकांनी महांडळाच्या अधिकाऱ्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत धाव घेऊनही दंडवसुली थांबली नाही. त्यामुळे अखेर शेवटचा पर्याय म्हणून या चालकांनी आता थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दरबारी धाव घेत न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू, असा इशारा दिला आहे.
ठाणे एसटी विभागाला सर्वात जास्त आर्थिक नफा मिळवून देणारे स्वारगेट, पुणे स्टेशन, सातारा, कोल्हापूर, सांगली, बारामती इत्यादी ठिकाणे आहेत. येथे ये-जा करण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गाचा (एक्स्प्रेस वे) वापर करावा लागतो. मात्र या महामार्गावर आरटीओकडून स्पीड गन कॅमेऱ्यांमार्फत एसटीचालकांना लाखो रुपयांचा दंड पाठविला जात आहे. जुन्या बसचे स्पीडो मीटर बंद अवस्थेत असून, दंड एसटी महामंडळाने भरण्याऐवजी चालकाच्या पगारातून कपात केला जात आहे. या त्रासाबद्दल अधिकारी, परिवहन मंत्री आणि मुखमंत्र्यांकडे समस्या मांडून न्याय मिळत नाही, म्हणून आता थेट नितीन गडकरी यांच्याकडे आमच्या समस्या पाठवल्या आहेत, असे चालकांनी सांगितले.
यासंदर्भात ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून चालकांची ही समस्या परिवहन विभाग, एसटी महामंडळाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यावर काही महिने दंडवसुलीला स्थगिती दिली होती.

एकाला सहा लाखांचा दंड
मला सहा लाखांचे चलान भरण्यास सांगितले आहे. मला लहान लहान मुलं आहेत. माझी परिस्थिती बिकट आहे. माझ्या जीवाचं काय कमी-जास्त झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, अशी प्रतिक्रिया वाडा आगारातील एका चालकाने दिली.

जगायचे कसे?
शाळेची फी, कुटुंबाचे पोट भरणे तुटपुंजा पगारात शक्य होत नसताना एसटी महामंडळ आमच्या पगारातून जबरी वसुली करीत आहे. चुकी अधिकाऱ्यांची आहे, शिक्षा आम्हाला का, असा सवाल खाेपट आगारातील एका बसचालकाने विचारला आहे.

दंड आकारण्यात आलेले चालक :
वाडा आगार - २१ चालक, दंडाची रक्कम - सुमारे २० लाख
खोपट आगार - चालक २० - दंडाची रक्कम - सुमारे ३० लाख
२०२४ मध्ये ठाणे विभाग चालकांना आलेला दंड - ६०,९९,७६५ रुपये

चालकांना येत असलेला दंड जुलमी आहे. याबाबत युनियनच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवत आहोत. नुकतेच परिवहन मंत्री परिवहन आयुक्तांची भेट घेतली असून, त्यांनी या चालकांसाठी अभय योजना सुरू करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
- संदीप शिंदे,
अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, महाराष्ट्र

चालकांचे म्‍हणणे काय?
- जुन्या गाड्यांचे सगळे स्पीड मीटर बंद आहेत. मग उतारावर बस ४० ऐवजी ४५ वर गेली तर चालकाला कसे समजणार?
- आरटीओ नियमानुसार गाडीचा स्पीड लॉक ८० वर असतो, मग गाडी ८०च्या पुढे कशी जाते?
- सामान्य जनतेला आपली व्यथा लोकन्यायालयात मांडण्याची मुभा असते; परंतु रा. प. कर्मचाऱ्यांना ती संधी दिली नाही.
- विनासूचना पगारातून दंडाची कपात सुरू केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com