

मोहाची झाडे ठरत आहेत फलदायी
फळांपासून भाजी, बियांपासून खाद्यतेल, टरफलांपासून पूरक खत
विक्रमगड, ता. १२ (बातमीदार) : विक्रमगड, जव्हार, मोखाडा या आदिवासी दुर्गम भागातील जंगलसंपदा ही स्थानिकांसाठी केवळ निसर्गसौंदर्य नसून उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन ठरत आहे. औषधी वनस्पती, रानभाज्या यासह मोहाचे वृक्ष ग्रामीण व आदिवासी कुटुंबांच्या अर्थकारणाला बळ देणारे ठरत आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी व मजूरवर्गासाठी मोहाचे झाड हे ‘कल्पवृक्ष’ ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागात आंब्यानंतर मोहाच्या झाडाला दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्व आहे. या झाडापासून मिळणारे लाकूड उन्हापासून, वाऱ्यापासून व पावसापासून संरक्षण देण्यासाठी उपयोगी पडते. पावसाळ्यात झाडांची पालवी सुकून तयार होणारा पालापाचोळा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. शेतकरी हा पाला गोळा करून जाळतात व त्यापासून तयार होणारे सेंद्रिय खत भातशेतीसाठी वापरतात. मोहाच्या झाडाची खरी आर्थिक किंमत मात्र त्याची फुले, फळे व बियांमधून समोर येते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहाला पिवळसर फुले येतात. ही फुले सकाळी व दुपारपर्यंत वेचून सुकवली जातात. बाजारात या सुकलेल्या फुलांना प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दर मिळतो. यापासून स्थानिक पातळीवर गावठी मद्य तयार केले जाते. मर्यादित प्रमाणात याचा औषधी उपयोगही केला जातो, अशी स्थानिकांची धारणा आहे.
फुलांनंतर मोहाला येणारी फळे ‘मोहट्या’ (दोडे) म्हणून ओळखली जातात. कच्च्या अवस्थेतील दोड्यांपासून चविष्ट भाजी तयार केली जाते. काही ठिकाणी ही भाजी सुकवून वर्षभरासाठी साठवून ठेवली जाते. पिकलेल्या फळांमधून पाच ते सहा बिया मिळतात. या बियांमधील गाभा ‘डाळंब’ म्हणून ओळखला जातो. हा गाभा सुकवून तेल गिरण्यांमध्ये नेला जातो. एका कुटुंबाकडून हंगामात सुमारे एक क्विंटलपर्यंत बिया गोळा होतात. त्यापासून साधारण २० ते ३० किलोपर्यंत खाद्यतेल मिळते. बाजारात खाद्यतेलाचे वाढते दर (प्रतिकिलो १५० ते २०० रुपये) लक्षात घेता, मोहाच्या तेलामुळे शेतकऱ्यांची वर्षाकाठी १५ ते २५ हजार रुपयांची बचत होत असल्याचे सांगितले जाते.
मोहाचे तेल तयार करताना सुरुवातीला ते उकळवून त्यातील कडूपणा कमी केला जातो. काही ठिकाणी नागलीच्या पिठाची भाकर तेलात टाकून शुद्धीकरण केले जाते. हे तेल स्वयंपाकासाठी वापरले जातेच, शिवाय लहान मुलांना ताप किंवा सर्दी झाल्यास घरगुती उपाय म्हणूनही याचा उपयोग केला जातो. मोहाच्या फळांच्या टरफलांचाही शेतीत मोठा उपयोग होतो. ही टरफले शेतात टाकल्यानंतर पावसामुळे ती कुजून नैसर्गिक खत तयार होते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढून पिकांची वाढ चांगली होते. एकूणच, मोहाचे झाड हे ग्रामीण व आदिवासी भागातील कुटुंबांसाठी बहुउपयोगी ठरत असून, अन्न, इंधन, औषध, तेल आणि खत या सर्व गरजा पूर्ण करणारे महत्त्वाचे साधन बनले आहे. त्यामुळे या वृक्षांचे संवर्धन व लागवड वाढवणे गरजेचे असल्याची भावना स्थानिक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.