वाढत्या वाहनचोरींवर पोलिसांचा मोठा प्रहार

वाढत्या वाहनचोरींवर पोलिसांचा मोठा प्रहार
Published on

कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : कोळसेवाडी परिसरात वाढत्या वाहनचोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. संपूर्ण चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत १० दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, परिसरात सातत्याने वाढत असलेल्या दुचाकीचोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत गुरव आणि निरीक्षक गणेश न्याहदे यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू होता.
तपासादरम्यान ३ एप्रिलला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानक परिसरात काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शुभम ऊर्फ शिवम पथारे (२४) याला अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडून चोरीची दुचाकी जप्त करत चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. पथारे याने विविध भागांतून दुचाकी चोरी करून त्या लपवून ठेवत असल्याचे निष्पन्न झाले. पथारेच्या कबुली जबाबाच्या आधारे पोलिसांनी १० दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यांची अंदाजे किंमत ३.५५ लाख रुपये आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com