कल्याण-शिळ मार्ग ‘त्रासाचा मार्ग’

कल्याण-शिळ मार्ग ‘त्रासाचा मार्ग’
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १२ : कल्याण-शिळ मार्गावर शनिवारी सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहनचालकांना दिवसभर मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पलावा चौक, काटई नाका, रुणवाल गार्डन ते मानपाडा चौक या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, काही किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना तब्बल एक ते दीड तासांचा विलंब सहन करावा लागल्याची माहिती समोर आली.
या मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो-१२ प्रकल्प कामामुळे रस्त्यांची रुंदी आधीच कमी झाली आहे. त्यातच अवजड वाहनांची सततची ये-जा, रस्त्याकडेला वाढलेले अवैध पार्किंग आणि अतिक्रमणांमुळे परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे. अनेक ठिकाणी दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे कोंडीत भर पडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या समस्यांकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका कामगार, विद्यार्थी आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि धुळीमुळे वाहनचालकांचा त्रास अधिकच वाढला आहे. तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
वाहतूक नियंत्रणासाठी प्रभावी नियोजनाचा अभाव, अतिक्रमणांवर कारवाईचा अभाव आणि पर्यायी मार्गांची अपुरी व्यवस्था यामुळे ही समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना होत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या महत्त्वाच्या मार्गावरील समस्येकडे तातडीने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

समाजमाध्यमांवर टीका
मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी या परिस्थितीवरून समाजमाध्यमांवर टीका केली. मेट्रोच्या कामामुळे वाहतूक कोंडी वाढली असून, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच स्थानिक नागरिकांनी ‘स्मार्ट सिटी’ऐवजी ‘ट्रॅफिक सिटी’ अशी उपरोधिक टीका करत प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com