अवजड वाहनांवरील बंदी कागदावरच

अवजड वाहनांवरील बंदी कागदावरच
Published on

अवजड वाहनांवरील बंदी कागदावर
चारोटी-आशागड मार्गावर नियमांचे उल्लंघन

कासा, ता. १२ (बातमीदार) : डहाणू-जव्हार-मोखाडा-त्र्यंबक राज्य महामार्गवरील चारोटी ते आशागड यादरम्यान अवजड व व्यावसायिक वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली असतानाही या आदेशाची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे सध्या महालक्ष्मी देवीची यात्रा सुरू असल्याने या मार्गावर प्रवासी वाहतुकीची मोठी गर्दी आहे. अशा परिस्थितीत अवजड वाहनांची सुरू असलेली वर्दळ नागरिकांच्या सुरक्षेला धोका ठरत असून, प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

रस्ता रुंदीकरण व काँक्रीटीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत अवजड वाहनांना या मार्गावर प्रवेशबंदी लागू केली आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या उपाययोजनांकडे संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचे वास्तव आहे. चारोटी गावाजवळील पोलिस चौकीसमोरच ‘अवजड वाहनांना प्रवेशबंदी’ असा स्पष्ट फलक लावण्यात आलेला असतानाही त्याच ठिकाणाहून ट्रक व इतर जड वाहनांची सर्रास ये-जा सुरू आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान, या मार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्ता खोदलेला आहे. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली असून, काही पुलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून, अपघाताचा धोका अधिक तीव्र झाला आहे.

अशा स्थितीत अवजड वाहनांची बेकायदा वाहतूक रोखली नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. सदर बंदी आदेश अपर जिल्हादंडाधिकारी सुभाष भागडे यांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आला असला, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
पावसाळ्यापूर्वी हा मार्ग पूर्ण करणे अत्यावश्यक असताना, अनेक महिने प्रलंबित असलेली झाडतोड परवानगी मिळाल्यानंतर आता कामांना काही प्रमाणात गती मिळाली आहे. तरीही अवजड वाहतुकीवर नियंत्रण न ठेवल्यास कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

पावसाळा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला असून, त्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही तर नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पावसाळ्यात नदी-नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन डबकी तयार होण्याची शक्यता असल्याने प्रवास अधिकच त्रासदायक ठरणार आहे. दरम्यान, या संदर्भात पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com