

कर्जत-पनवेल रेल्वेला ऑक्टोबरचा मुहूर्त
कर्जत स्थानकातील यार्ड आणि सिग्नलिंगचे काम अद्याप अपूर्ण
कर्जत, ता. १२ (बातमीदार) ः नवी मुंबई आणि रायगडला जोडणाऱ्या महत्त्वाच्या पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे कॉरिडॉरचे उद्घाटन पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला होता; मात्र एप्रिल महिना उजाडला तरी प्रत्यक्ष जमिनीवर काही महत्त्वाची कामे अद्याप प्रगतिपथावर असल्याने प्रवाशांची प्रतीक्षा ऑक्टोबर २०२६ पर्यंत लांबण्याची चिन्हे आहेत.
२,७८३ कोटींचा आणि सुमारे २९.६ किमी लांबीचा हा दुहेरी रेल्वे मार्ग सध्या अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकृतरीत्या सांगितले जाते. या प्रकल्पातील सर्वात मोठे अभियांत्रिकी आव्हान ठरलेले वावरले येथील सुमारे २.६३९ किमी लांबीचे बोगदे आणि इतर दोन बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. चौक ते कर्जत यादरम्यान रेल्वे इंजिनची चाचणीही यशस्वी झाली आहे. प्रकल्पाचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी प्रत्यक्षात पाहणी केली असता काही महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसून येते. विशेषतः कर्जत स्थानक परिसरातील यार्डचे काम, सिग्नलिंग आणि काही नागरी बांधकामे अजूनही पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत. आणखी एका ट्रॅकचे काम प्रगतिपथावर आहे.
दरम्यान, कर्जतमध्ये उभारलेल्या नव्या स्थानकामुळे जुन्या आणि नव्या स्थानकाला जोडणाऱ्या सोयीसुविधांबाबत अद्याप संभ्रम आहे. कर्जत स्थानक परिसरातील अरुंद रस्ते आणि रिक्षा स्टँडमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता, रेल्वेने नगरपालिकेशी समन्वय साधून महामार्गालगतच्या वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
दोनदा हुकली डेडलाइन
सर्वात आधी हा प्रकल्प डिसेंबर २०२५ मध्ये सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. ही तारीख पुढे ढकलून मार्च २०२६ करण्यात आली होती, पण एप्रिल महिना उजाडला तरी अजून बरेच काम बाकी असल्याचं दिसत आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस ही मार्गिका प्रवाशांसाठी सुरू होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रवासाचा वेळ ४० मिनिटांवर येणार
सध्या रस्तेमार्गे कर्जत ते पनवेल प्रवासासाठी दीड तास लागतो, जो रेल्वेमुळे केवळ ४० मिनिटांवर येणार आहे. या मार्गावर पनवेल, चिखले, पोयंजे, चौक आणि कर्जत अशी पाच स्थानके असतील. आधुनिक बॅलास्टलेस ट्रॅक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने हा प्रवास वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. या लोकल सेवेचा कर्जत, उलवे, नेरळ आणि पनवेल परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे निवासी तसेच व्यावसायिक विकासालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कर्जत-पनवेल रेल्वे सुरू होण्याची मोठी उत्सुकता आहे. ही लाइन सुरू झाल्यास कर्जत व नवी मुंबई यांच्यातील दळणवळण अधिक सोयीचे होईल. नोकरी व व्यवसायासाठी मुंबई-नवी मुंबई गाठणे सुलभ होणार आहे. त्यामुळे कर्जत परिसरात नागरीकरणालाही चालना मिळेल.
- जगदीश दगडे, स्थानिक नागरिक
कर्जत-पनवेल रेल्वे वेळेत सुरू होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. रेल्वेच्या अनेक प्रलंबित समस्यांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कर्जत-पनवेल लोकल व मेल-एक्स्प्रेस सेवेचा नेमका कशा पद्धतीने प्रवाशांना फायदा घेता येईल, याबाबत प्रयत्न करणार आहोत. या प्रश्नांवर रेल्वे प्रशासनाशी लवकरच समितीच्या माध्यमातून चर्चा केली जाणार आहे.
- कृष्णा जाधव, रेल्वे प्रवासी हक्क समिती, कर्जत, सदस्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.