

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : ठाणे जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात जिल्हा निवडणूक विभागामार्फत एसआयआर मोहीम राबविण्यात येत असून, मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. मुंब्रा भागात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी १० दिवसांचा अतिरिक्त कालावधीही वाढविला आहे. मात्र, यादरम्यान गंभीर बाब समोर आली आहे. पालिका क्षेत्रात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे बीएलओची जबाबदारी सोपविल्याचे उघड झाले आहे. नियमांनुसार अशा कर्मचाऱ्यांना ही जबाबदारी देणे अपेक्षित नसतानाही काम दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्ह्यात एसआयआर मॅपिंगचे काम इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात झाले आहे. त्यामुळे हे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्ह्यात एसआयआर शिबिराची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये घरोघरी जाऊन मतदारांची माहिती गोळा केली जात आहे. यासाठी शिक्षकांची नियुक्तीही काही ठिकाणी केली आहे. महापालिकेच्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये कार्यरत असलेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनाही म्हणजेच सफाई कामगार, बिगारी, शिपारी, स्लुसमन आदींना बीएलओचे काम सोपविले आहे. या कर्मचाऱ्यांचे हे काम करण्याएवढे शिक्षणच नाही. त्यामुळे त्यांना बीएलओ म्हणजे काय, त्यांचे काम काय हेदेखील माहीत नसल्याची बाब समोर आली आहे.
या कर्मचाऱ्यांनी भाजप आमदार संजय केळकर यांना शुक्रवारी निवेदन देत समस्या मांडल्या. त्यांची शैक्षणिक पात्रता मर्यादित असल्याने बीएलओ पदाशी संबंधित कामकाज, विशेषत: मोबाईल अॅप्सचा वापर, ऑनलाइन नोंदी व माहिती संकलनात अडचणी येत आहेत. कामकाजात अनेक वेळा तांत्रिक अडचणींमुळे चुका होण्याची शक्यता आहे. मतदारांशी संवाद साधतानाही अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता आहे, असे कर्मचाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
मानपाड्यात कर्मचारी
शैक्षणिक पात्रतेचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन, प्रशिक्षण किंवा पयार्यी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी; तसेच कामकाजात अनवधानाने झालेल्या चुकांबाबत त्यांना जबाबदार धरू नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सुमारे २५ चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना हे काम दिले आहे. त्यात अगदी ५९ वर्षे वयापर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यांनी तत्काळ चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना यातून मुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनीही याची कल्पना नव्हती असे सांगितले. मात्र, ही चूक कोणाची त्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
- संजय केळकर, आमदार, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.