

ठाण्यात आरटीईसाठी १०,५७८ बालकांची निवड
लॉटरीत निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू; २० एप्रिलपर्यंत मुदत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी ठाणे जिल्ह्यात यंदा २५ हजार ५३ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले. राज्यस्तरावर लॉटरी प्रक्रियेत ठाणे जिल्ह्यातील १० हजार ५७८ अर्जांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी २० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (क) नुसार स्वयंअर्थसहाय्यित विनाअनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून) शाळांमध्ये प्रवेश स्तर वर्गात २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. वंचित गटातील व दुर्बल घटकातील बालकांना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारमार्फत दरवर्षी आरटीईअंतर्गत २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा महापालिका कार्यक्षेत्रांतील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १० एप्रिल २०२६ला राज्यस्तरावर लॉटरी प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत ठाणे जिल्ह्यातील १०,५७८ अर्जांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी २० एप्रिल २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. संबंधित पालकांनी विहित मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.
प्रवेश प्रक्रिया
ऑनलाइन भरलेल्या अर्जाची प्रत घ्यावी, हमीपत्र प्रिंट काढावी, अर्ज भरताना अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत घ्याव्यात, संबंधित तालुका, पालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करून घ्यावा. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेणे आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित शाळेत कागदपत्रे जमा करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
या सूचना महत्त्वाच्या
- पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती मिळेल. मात्र केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर जाऊन अर्ज क्रमांक टाकून निवडीची खात्री करून घ्यावी.
- ॲडमिट कार्ड व हमीपत्राची प्रिंट लॉगिनमध्ये उपलब्ध राहील.
- ऑनलाइन अर्ज करताना अपलोड केलेली कागदपत्रेच पडताळणीसाठी ग्राह्य धरली जातील. त्याच कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित प्रती सादर करणे आवश्यक आहे.
- विहित कालावधीत (२० एप्रिल २०२६ पर्यंत) प्रवेश ऑनलाइन निश्चित करणे बंधनकारक आहे.
- प्रवेश निश्चित झाल्यानंतर पडताळणी समितीकडून पावती घेणे आवश्यक आहे.
प्रतीक्षा यादीबाबत
निवड यादीतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची मुदत संपल्यानंतरच प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना अनुक्रमे एसएमद्वारे माहिती दिली जाईल. प्रवेश प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण आल्यास संबंधित तालुका अथवा महापालिका कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
---------------------
मथळे व उपमथळे द्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.