श्रद्धांजली

श्रद्धांजली
Published on

आशा भोसले मान्यवर श्रद्धांजली
........
आशाताईंच्या जाण्याने भारतीय संगीतातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे केवळ स्वरांनीच नाही, तर अफाट संघर्षानेही व्यापलेले होते. एक व्यक्ती म्हणून त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार आणि कष्ट सोसले, पण त्या कधीही डगमगल्या नाहीत. उलट त्या प्रत्येक संकटाशी जिद्दीने झुंज देत राहिल्या आणि प्रत्येक वळणावर नवनवीन प्रकारची गाणी गात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत राहिल्या. आशाताईंकडून प्रत्येक माणसाने प्रेरणा घ्यायला हवी. संगीताप्रती त्यांचे समर्पण शेवटच्या श्वासापर्यंत कायम होते. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
-अनुराधा पौडवाल, गायिका
.........
आशा भोसले हे नाव केवळ संगीतप्रेमींसाठीच मर्यादित नव्हते. ते सामान्य माणसाच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबत राहणारे नाव आहे. भारतीय आणि विशेषतः मराठी रसिकांच्या बाबतीत बोलायचे झाले, तर आशाताईंचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलून येते. संगीतातील ‘अष्टपैलू’ हा शब्द कदाचित त्यांच्यासाठीच निर्माण झाला असावा. त्या एकमेव अशा गायिका होत्या, ज्यांनी या शब्दाला खऱ्या अर्थाने आणि पुरेपूर न्याय दिला. त्यांचे जाणे ही मोठी हानी असली, तरी मला वाटते त्या कुठेही गेलेल्या नाहीत. आपल्यासारख्या कोट्यवधी श्रोत्यांच्या मनात गाण्यांच्या रूपाने नेहमीच जिवंत राहतील. त्यांनी आपल्या सुरांनी जसे आपले आयुष्य सुंदर केले, तसेच त्या जिथे कुठे असतील, तिथेही आपल्या स्वरांनी चैतन्य निर्माण करतील.
-अजित परब, गायक
........
आशाताईंच्या जाण्याने प्रत्येक रसिक श्रोत्याच्या मनात एक कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आशाताई आम्हा सर्व संगीतप्रेमींसाठी एक भक्कम ‘आधारस्तंभ’ होत्या. त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले, त्यांनी खूप काही सोसलं, पण त्या प्रत्येक संकटासमोर ताठ मानेने उभ्या राहिल्या. त्यांच्या या जिद्दीची आणि सुरांची दखल घेऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळायला हवा होता, असं मला मनापासून वाटतं. ही केवळ माझीच नाही, तर जगभरातील प्रत्येक रसिक श्रोत्याची हीच भावना आहे. संगीताप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जपलेली आपली कला, हा आम्हा सर्व कलाकारांसाठी एक मोठा वस्तुपाठ आहे.
-बेला शेंडे, गायिका
...................
एक अष्टपैलू गायिका, ज्यांनी आपल्या गाण्यातून प्रत्येक अंग सादर केलं आणि नुसतं सादरीकरण न करता त्यांनी ते शिखर गाठलं. आशाताईंच्या स्वभावापासून ते गाण्यांपर्यंत त्यांचं एक वेगळंच रूप सगळ्यांना माहीत होतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व फारच अष्टपैलू आहे. त्यांच्याकडून प्रत्येक गायकाला कधी ना कधी अनेक गोष्टी शिकता आल्या. एक गायक म्हणून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी मी त्यांच्याकडून लहानपणापासून ऐकत आलो आहे. पुढच्या अनेक पिढ्यांना त्यांच्या गाण्यांमधून आणि रचनांमधून शिकायला मिळेल.
-मंगेश बोरगावकर, गायक
.....................
आशाजी खरंच एक अष्टपैलू गायिका होत्या. प्रेम, विरह, कॅबरे, लावणी, नाट्यगीत, त्यांनी केवळ प्रत्येक शैलीत गायलं नाही, तर त्या प्रत्येक शैलीवर आपली अढळ छाप उमटवली आहे. आयुष्यात कितीही संघर्ष असो, पण त्यांच्या संगीताने सदैव आनंदच दिला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे तेज इतके प्रखर होते की, नव्वदीतही त्या रंगमंचावर अगदी उत्साहाने हसत-नाचत जीवनाचा उत्सव साजरा करत उभ्या राहायच्या. रंगमंचाच्या पलीकडे त्यांचा आपुलकीचा स्वभाव, विनोदबुद्धी आणि प्रेम; सगळ्यांसाठी स्वयंपाक करणं, प्रत्येकाला आपलंसं वाटू देणं या त्यांच्या साधेपणाला स्टारडम आणि यशाने कधीच स्पर्श केला नाही. केवळ संगीतामध्येच नव्हे, तर त्यांनी जगलेल्या जीवनशैलीतही त्यांच्यासारखे महान व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही.
-आर्या आंबेकर, गायिका
..................

गेली अनेक वर्षे आशाताई तुम्ही तुमच्या आवाजाने अनेकांना सावरले, घडवले आणि पुढील कित्येक वर्षेही तसेच होईल. हा पराकोटीच्या आनंदाचा निर्मळ झरा आम्हाला प्रत्यक्ष पाहता येणार नाही, पण त्याचे तुषार आम्हाला स्वरांनी चिंब करत होते आणि करत राहतील. सदैव तुमच्या ऋणात... तुम्ही जिथे असाल तिथेही तुमच्या असण्याने स्वररूपी नवसंजीवनी द्याल.
तुम्हाला वंदन आशाताई.. ओम शांती....
-सुबोध भावे, अभिनेते
.........................
आपण एक असा आवाज गमावला आहे, ज्याने पिढ्यान्‌पिढ्या घडवल्या… एक असा आत्मा, ज्याने संगीतालाच नव्याने परिभाषित केलं. आशा भोसले या फक्त दिग्गज नव्हत्या, त्या असीम होत्या. मी त्यांच्या गाण्यांमध्ये वाढले… त्यांच्याकडून शिकले… त्यांच्या सहजतेने व्यक्त होणाऱ्या बहुआयामी कलेचं नेहमीच कौतुक करत राहिले. त्या प्रत्येक सुराला जिवंत करत, प्रत्येक भावनेला आपलंसं बनवायच्या. खेळकर गाणी असोत, गझल असोत किंवा मराठी, बंगाली आणि असंख्य भाषांतील त्यांची अप्रतिम गाणी, त्या प्रत्येक वेळी वेगळ्या, पण तितक्याच अप्रतिम वाटायच्या. आपल्यापैकी अनेकांसाठी त्या फक्त प्रेरणा नव्हत्या… त्या आपल्या संगीतात्म्याचाच एक भाग होत्या. मी स्वतःला भाग्यवान समजते की त्यांच्या महानतेचं साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली. त्यांचा आवाज काळाच्या पलीकडे घुमत राहील. त्यांची परंपरा कधीच मावळणार नाही.
-श्रेया घोषाल, गायिका
.............
आज भारतीय संगीतविश्वातील एका महान युगाचा पडदा पडला आहे. भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा शेवटचा आधारस्तंभ असलेल्या या महान वीरांगनेने आपला निरोप घेतला. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे अनेक आव्हाने, संकटे आणि संघर्षाने भरलेले होते, परंतु याच संघर्षातून त्यांनी अफाट यश संपादन केले. आपल्या सुरांनी आणि चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाने त्यांनी अनेक दशके कोट्यवधी लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला. आयुष्याच्या शेवटपर्यंत रियाजाबद्दल असलेली त्यांची जिद्द आम्हा सर्व कलाकारांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली. आशाजी, १९९४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटलो आणि तुमच्यासोबत गाण्याची संधी मिळाली, तिथपासून ते डिसेंबर २०२४ मधील आपली शेवटची मैफल आणि गेल्या वर्षी आपण एकत्र गायलेली शेवटची गीते... हा संपूर्ण प्रवास मी अत्यंत आनंद आणि अभिमानाने स्मरणात ठेवीन. तुमच्याबद्दलच्या भावना व्यक्त करताना मी एवढेच म्हणेन की, ‘चले तो गये हो पर, दिल अभी भरा नहीं...’
-सोनू निगम, गायक
.....................
आशाताईंच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वातील एक महान पर्व संपलं आहे. दिवस-रात्र आपण या महान कलाकारांची गाणी ऐकत असतो आणि अचानक ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोरून नाहीशी होते, याचं मनापासून दुःख होतं. माझा तर मंगेशकर कुटुंबीयांशी वैयक्तिक संबंध होता व अजूनही आहे. मी जेव्हा पेडर रोडला हृदयनाथजींकडून गाणं शिकायला जायचे, तेव्हा लतादीदींची अनेकदा भेट व्हायची, कधीतरी आशाताईंचीही भेट व्हायची. पण ही बातमी ऐकून असं वाटलं की खरंच, ही संगीत क्षेत्रातील एक अपरिमित हानी आहे. आशाताई त्यांच्या सुरांच्या रूपाने त्या कायम आपल्या सोबत आहेत.
-पद्मजा फेणाणी-जोगळेकर, गायिका
..................
आशाताईंच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. ‘उरले उरात काही आवाज चांदण्यांचे’ सुरेश भटांचे हे शब्द ऐकले तेव्हा वाटलं होतं की, चांदण्यांचा म्हणून काही आवाज असला, तर तो आशाताईंचाच असेल. आज मात्र ‘आकाश तारकांचे उचलून रात्र गेली’ तरी आमच्या कानांत, मनात, उरात हा ‘आवाज चांदण्यांचा’ कायम राहील.
- कौशल इनामदार, गायक
......
प्रत्येक मनाला प्रेमाची भाषा शिकवणारा आवाज, म्हणजेच आपल्या लाडक्या आशा भोसलेजी आता आपल्यात नाहीत.. या बातमीवर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. गेल्याच महिन्यात मी त्यांची भेट घेतली होती आणि त्यांचा आशीर्वाद घेतला होता... त्यांचं वलय नेहमीप्रमाणेच मला थक्क करणारं होतं. त्या केवळ एक प्रेरणा नव्हत्या, तर त्या संगीताची एक अखंड संस्था होत्या. आपल्या सुमधुर गाण्यांच्या माध्यमातून त्या सदैव आपल्यात जिवंत राहतील.
- हर्षदीप कौर, गायिका
.......
आशाताईंची थोरवी सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच अपुरे आहेत. अशी कोणतीही गोष्ट नव्हती जी त्यांना कधी जमलीच नाही. त्या खऱ्या अर्थाने एक ‘युगप्रवर्तक’ होत्या. कलेप्रती असलेली निष्ठा आणि एखादी गोष्ट पूर्णत्वास कशी न्यायची, याचा वस्तुपाठच त्यांनी आम्हा सर्वांसमोर घालून दिला.
- चिन्मयी श्रीपदा, गायिका
.................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com