

डॉ. एपीजे अब्दुल कलाम उद्यान फुलांनी बहरले
निसर्गसौंदर्याने नागरिक मंत्रमुग्ध
तुर्भे, ता. १२ (बातमीदार) ः नवी मुंबईतील डॉ. एपीजे अब्दुल कलाम उद्यान सध्या रंगीबेरंगी फुलांच्या बहराने खुलून गेले असून नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. चैत्र महिन्याच्या आगमनासह वसंत ऋतूची चाहूल लागली आहे आणि वाढत्या उन्हाच्या झळांमध्येही या उद्यानाने निसर्गप्रेमींना एक सुखद दिलासा दिला आहे. वाशीतील सेक्टर १०, जुहूगाव चौपाटीलगत असलेल्या या उद्यानात विविध वृक्षांच्या फुलोऱ्यामुळे संपूर्ण परिसर नटून गेला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने अमृत मिशनअंतर्गत २०१७-१८ मध्ये येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली होती. सुमारे २,२०० भारतीय प्रजातींच्या झाडांमध्ये सीता अशोक, चाफा, बहावा, वड, पिंपळ, बकुळ, टेबुबिया, ताम्हण आणि भेंड यांचा समावेश आहे. आज त्याच वृक्षांनी फुलांच्या माध्यमातून आपली शोभा खुलवली आहे. विशेषतः बहावा, सीता अशोक आणि ताम्हण यांच्या बहरामुळे उद्यानात पिवळ्या, जांभळ्या आणि केशरी रंगांची उधळण दिसून येते.
शहरीकरणाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर अशा हरित क्षेत्रांचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. स्थानिक नागरिकांनी मनपाच्या या उपक्रमाचे कौतुक करत, शहरात अशा उद्यानांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे.
नियमित देखभाल
या फुलांच्या निसर्गसौंदर्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना प्रसिद्ध कास पठारासारखा अनुभव मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे. सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली असून कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण पसंतीस उतरले आहे. उद्यान विभागाकडून नियमित देखभाल, पाणीपुरवठा, छाटणी आणि स्वच्छता यांवर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे वृक्षांची वाढ चांगली होऊन फुलांचा बहर अधिक खुलला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.