

चैत्यभूमी, राजगृह परिसरात जयंतीची लगबग
भीम अनुयायांच्या स्वागतासाठी मंडप, रोषणाई आणि विशेष सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरमधील चैत्यभूमी परिसर आणि शिवाजी पार्क सजू लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भीम अनुयायांची गौरसोय होऊ नये म्हणून चैत्यभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर भव्य मंडप उभारला असून, रस्त्यांवर सर्वत्र विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा पुस्तके, बाबासाहेबांच्या प्रतिकृती, छायाचित्रांची दुकाने सजली आहेत.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभा, मुंबई महापालिका आणि राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून चोख नियोजन करण्यात येत आहे. ठिकठिकाणी सोयीसुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. रस्त्यांवर स्वच्छता, मार्गदर्शक फलक, अभिवादनासाठी लावल्या जाणाऱ्या रांगेच्या ठिकाणी सावली केली जात आहे. त्याचबरोबर चैत्यभूमीच्या ठिकाणी फुलांची सजावट केली जाणार आहे. दरम्यान, बाबासाहेबांची पुस्तके आणि लहान आकाराचे पुतळे आणि इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. त्याचबरोबर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केले जात आहे.
आज भव्य ड्रोन शो
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून शिवाजी पार्क मैदानावर तब्बल २,००० ड्रोनचा शो केला जाणार आहे. उद्या सोमवारी (ता. १३) सायंकाळी ७ वाजता हा ड्रोन शो पार पडणार आहे. या माध्यमातून बाबासाहेबांची प्रतिकृती, संसद भवन साकारले जाणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
राजगृहाला फुलांची आरास
महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या दादर पूर्वेकडील राजगृहाला रंगीबेरंगी आकर्षक फुलांची आरास केला जाणार आहे. तसेच संपूर्ण इमारतीवर आणि परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. राजगृहाच्या संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत बुंदीच्या लाडूंचे वाटप केले जाणार आहे. ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था, उन्हामुळे लोकांना त्रास होऊ नये यासाठी राजगृह चौक ते खारेघाट रोडवर मंडप उभारला जाणार असल्याचे राजगृहाचे व्यवस्थापक उमेश कसबे यांनी सांगितले.
राजगृह-चैत्यभूमीदरम्यान रॅली
भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मंगळवारी राजगड ते चैत्यभूमीदरम्यान भव्य रॅली काढली जाणार आहे. या रॅलीत ४०० हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.