

उल्हासनगर, ता. १२ (वार्ताहर) : समता, न्याय आणि बंधुतेच्या विचारांचा जागर करत उल्हासनगर महापालिकेतर्फे ‘सामाजिक समता सप्ताह’ उत्साहात साजरा केला जात आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी शहरात व्याख्याने, आरोग्य शिबिरे आणि स्वच्छता अभियानासह विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार ८ ते १४ एप्रिलदरम्यान हा सप्ताह सुरू आहे. यंदा संविधानाच्या ७५ वर्षांच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त; तसेच संत गाडगे महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आणि लघुनाट्य सादरीकरणे असणार आहेत. यासोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम राबवून ‘संविधान जागर’ उपक्रमांतर्गत नागरिकांना त्यांच्या अधिकार व कर्तव्यांची जाणीव करून दिली जात आहे.
शहरवासीयांसाठी मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिरे तसेच महिलांसाठी कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू करण्यात आले आहे. स्वच्छता अभियान राबविण्यासोबतच महापुरुषांच्या पुतळ्यांभोवती आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान, १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मध्यरात्रीपासून अभिवादनासाठी मोठी गर्दी अपेक्षित आहे. नागरिकांसाठी पाणी, अल्पोपहार, बैठक व्यवस्था आणि सुरक्षेची विशेष तयारी करण्यात आली आहे. महापालिकेने नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.