

फोनवर विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक
भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) ः एका ५० वर्षीय शिक्षकाने १७ वर्षीय विद्यार्थिनीला फोन करून अश्लील शब्दांत संभाषण करून विद्यार्थिनीचा विनयभंग करून गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासला आहे. याप्रकरणी नराधम शिक्षकाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. गणेश भालेराव पाटील (५० रा. कल्याण पूर्व) असे अटक केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १९ मार्चला पीडित विद्यार्थिनीला रात्री ९ वाजता फोन करून अन्य दोन मैत्रिणींचे नंबर मागितले. त्यानंतर फोनवर पीडितेशी प्रेमाच्या गोष्टी करून अश्लील शब्दांत संभाषण करून विद्यार्थिनीचा विनयभंग केला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात पीडितेच्या तक्रारीवरून शुक्रवारी (ता. १०) पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.