

श्री काळभैरव मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा
मंत्री भरत गोगावले यांची उपस्थिती
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील पन्हळघर बुद्रुक येथे जागृत देवस्थान श्री काळभैरव मंदिराच्या उद्घाटन व विविध देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. रायगड किल्ला यांच्या पायथ्याशी वसलेल्या या ऐतिहासिक आणि पवित्र भूमीला विशेष धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या श्री काळभैरव देवस्थानासह जोगेश्वरी माता, सोमजाई माता आणि काळकाई माता यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा दिनांक २३ व २४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.
या दोनदिवसीय धार्मिक सोहळ्यात विविध पूजाविधी, होमहवन, अभिषेक, पालखी सोहळा व भजन-कीर्तन यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे रोजगारहमी मंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार असून, त्यांच्यासोबत विविध क्षेत्रातील मान्यवर, लोकप्रतिनिधी, तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.