

गिधाडाच्या पिल्लाला जीवदान
श्रीवर्धन, ता. १३ (वार्ताहर) ः श्रीवर्धन येथील जीवनेश्वर पाखाडी परिसरात रविवारी (ता. १२) एका तीन महिन्यांच्या गिधाडाच्या पिल्लाला पक्षीमित्रांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. गटारात पडलेल्या या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
जीवनेश्वर पाखाडीतील एका गटारात गिधाडाचे पिल्लू पडल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वन्यजीव रक्षक गणेश कुडगावकर, अंकित तोडणकर आणि पारस पोरनाक यांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पक्षीमित्रांनी घटनास्थळी धाव घेत पिल्लाला बाहेर काढले व प्राथमिक उपचारानंतर श्रीवर्धन वन विभाग वन परिक्षेत्र अधिकारी स्वप्नील चंबुळे यांच्या देखरेखीखाली गिधाडाच्या पिल्लाला ठेवण्यात आले आहे. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे आणि पाण्याच्या कमतरतेमुळे पिल्लू बेशुद्ध पडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.