

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावली हरपली
महामार्गावर उन्हाचे चटके; प्रवाशांच्या अंगाची लाही लाही
पोलादपूर, ता. १३ ः राज्यात सध्या उन्हाचा पारा हा वाढत असून, नागरिक पुरते हैराण झाले आहेत. तापमान हे ४२ अंशाच्या वरती पोहोचलेले दिसत आहे. याचा मोठा फटका मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणात हजारो जुनी झाडे तोडल्यामुळे आता या मार्गावरील सावली हरपली आहे. त्यामुळे महामार्गावर उन्हाची झळ बसत असून, दुचाकीस्वारांचे प्रचंड हाल होत आहेत.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच वर्दळी असते. मात्र, या महामार्गावरील सावली पूर्णपणे हरपली असून, उन्हातून प्रवास करणे घातक ठरत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेस महामार्गावर शुकशुकाट असल्याचे दिसत आहे. जुन्या महामार्गावर ठिकठिकाणी जवळपास १०० ते २०० वर्षांपूर्वीची जुनी झाडे उभी होती. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी सावली मिळत होती. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणात महाड-पोलादपूर यादरम्यान असलेली हजारो मोठमोठी झाडे तोडण्यात आली. महामार्गाचे काम झाल्यानंतर महामार्गालगत नवीन झाडे लावणे गरजेचे होते. मात्र, तसे होताना दिसत नाही, तर काही ठिकाणी रस्त्यालागत लावलेल्या झाडांना पाणी मिळत नसल्याने व वाढत्या वणव्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या महामार्गावरून प्रवास करताना कुठेही सावलीचा आश्रय मिळत नाही.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत महाड-पोलादपूर यादरम्यान एकही झाड नसून प्रवाशांना प्रवास करताना अक्षरशः उन्हाचे चटके बसत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे भविष्यात महामार्गावर ठिकठिकाणी झाडे लावणे गरजेचे आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बनताना हजारो झाडे तोडण्यात आलेली आहेत. ती झाडे जवळपास ५० ते १०० वर्षे जुनी होती. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना कुठेही सावली मिळत नसून दुचाकीस्वारांनादेखील उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे.
- संकेत सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते
मुंबई व महामार्गावरून प्रवास करताना उन्हाची झळ बसत असून, महामार्गालगत झाडे नसल्याने सावलीचा आश्रयदेखील घेता येत नाही. त्यामुळे महामार्गालगत झाडे लावून निगा राखणे गरजेचे आहे.
- सचिन मेहता, दुचाकीचालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.