

ठाणेकरांना लवकरच मिळणार हक्काचे चार्जिंग स्टेशन
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे शहरातील वाहनांपासून होणारे प्रदूषण कमी करण्यावर व ठाणेकरांनी पर्यावरणपूरक प्रवासाकडे वळावे, यासाठी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासह वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दुसरीकडे रखडलेला पालिका हद्दीतील ई-वाहन चार्जिंग स्टेशनचा प्रस्ताव मार्गी लागला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, तांत्रिक कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच विविध भागांत १९ सार्वजनिक ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून, ई-वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाणे पालिकेने पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन वापरास चालना मिळावी, यासाठी २०२२च्या महासभेच्या ठरावानुसार निश्चित करण्यात आलेल्या ३० जागांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी १९ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणे शक्य असल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. ही चार्जिंग स्टेशन पीपीपी तत्त्वावर खासगी संस्थेमार्फत उभारली जाणार असून, त्यातून मिळणाऱ्या नफ्यातील १० टक्के हिस्सा महापालिकेला मिळणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने सल्लागाराची नियुक्ती केली होती. त्यानुसार ६ मे २०२५ला सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत सुमारे १० कोटी ५० लाख रुपये खर्चाची चार्जिंग स्टेशन उभारणी होणार असून, त्याचा खर्च निविदाधारकाकडून केला जाणार आहे. निविदेद्वारे ठेकेदाराची निवड केली जाणार असून, महापालिकेला किमान एक रुपया प्रतियुनिट दराने सर्वाधिक महसूल देणारी निविदा मंजूर करण्यात येणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या माध्यामतून ई-वाहन चार्जिंग स्टेशनसंदर्भातील निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, निविदाधारकांचे (टेक्निकल बीड) तांत्रिक कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणेकरांना लवकरच सार्वजनिक ई-वाहन चार्जिंग स्टेशन मिळणार असून, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१० वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध
नुकत्याच राबवण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत अंतिम निविदाधारकास महापालिकेकडून चार ते पाच मीटर रुंद आणि २० ते ३० मीटर लांब जागा १० वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. उभारणी, संचालन, देखभाल, वीजजोडणी, आवश्यक परवानग्या आणि सुरक्षा यांची जबाबदारी निविदाधारकावर राहणार आहे. पहिल्या तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी निश्चित करण्यात आला आहे. ई-वाहन चार्जिंगसाठी आकारले जाणारे दर हे केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील. चार्जिंग स्टेशन परिसरात व्यावसायिक जाहिरातीस मनाई करण्यात आली आहे.
येथे असणार चार्जिंग स्टेशन
- नौपाडा-कोपरी : मनोरुग्णालय चौक, कशिश पार्क सेवा रस्ता
- उथळसर : वृंदावन बस स्टॉप, कचराळी तलाव, आकाशगंगा, राबोडी
- वागळे : रोड क्रमांक २२, पासपोर्ट कार्यालयाजवळ
- लोकमान्य सावरकरनगर : लोकमान्य बस डेपो जंक्शन, पोखरण रोड क्र. १, देवदयानगर
- वर्तकनगर : पोखरण रोड क्र. २, गांधीनगर जंक्शन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ
- माजिवडा-मानपाडा : आनंदनगर बस स्टॉप, सुविधा भूखंड पातलीपाडा, यूआरसीटी जंक्शन, धर्माचा पाडा
- कळवा : खारेगाव सेवा रस्ता (९० फूट रोड), खारेगाव टोलनाका, आत्माराम चौक
- मुंब्रा : मुंब्रा स्पोर्टस कॉम्प्लेक्स
- दिवा : आयुष्यमान आरोग्य केंद्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.