

खालापुरात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
आकर्षक व्याजाचे प्रलोभन दाखवून फसवणूक
खालापूर, ता. १३ (बातमीदार) ः गुंतवणुकीवर आकर्षक व्याज आणि मुद्दल परताव्याचे प्रलोभन दाखवून नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार खालापूरमध्ये उघडकीस आला आहे. सावी कन्सल्टन्सी इंटरप्रायझेस आणि स्वामीश कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची भीती व्यक्त केली असून, याप्रकरणी खालापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्वेता प्रभू (हिरानंदानी, भोकरपाडा), प्रसाद विध्वंश (खोपोली), देवेंद्र सरदार (तळेगाव वाडी), पंकज शहा (खालापूर), अमित प्रभू (मीरा-भाईंदर), आकाश पाटील (सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी सावी कन्सल्टन्सी इंटरप्रायझेस या नावाने सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून ऑनलाइन स्वरूपात उदयम नोंदणी प्रमाणपत्र मिळवून जून २०२२ मध्ये चौक येथे कार्यालय सुरू केले. यानंतर २०२४ मध्ये खालापूर येथे सालासर बालाजी कंपाउंड येथे कार्यालय उघडले होते. दलालांच्या माध्यमातून त्यांनी १७ महिन्यांच्या गुंतवणुकीवर दरमहा सहा टक्के व्याज आणि सहा टक्के मुद्दल, असा एकूण १२ टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले होते. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात रक्कम दिल्यानंतर सुरुवातीला व्याजाची रक्कम देऊन विश्वास संपादन केला. स्वीकारलेल्या रकमेची हमी म्हणून गुतंवणूकदारांसोबत सामंजस्य करार करून विश्वास संपादन केला, परंतु १० महिन्यांपासून कंपनीने गुंतवणूकदारांना व्याज देणे बंद केले. याप्रकरणी संकेत कांडेलकर (वय २६, रा. जांभिवली आपटा) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संकेत आणि त्यांच्या नातेवाइकांनी मिळून कंपनीत गुंतवलेल्या १६ लाख ७५ हजार रुपयांचा अपहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन पवार पुढील तपास करत आहेत. सध्या शेकडो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले असून, अनेक जण तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे फसवणुकीचा हा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.