

‘स्मार्ट सिटी’तील घर डोईजड
पुनर्विकास प्रकल्पांमुळे भाडे आवाक्याबाहेर
वाशी, ता. १३ (बातमीदार)ः नवी मुंबई शहरातील आयटी पार्कचे वाढते जाळे तसेच विविध भागांमध्ये सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांमुळे शहरात घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या मागणीचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर झाला असून, नवी मुंबईत भाड्याने घर घेणेही आवाक्याबाहेर गेले आहे.
मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी ७० च्या दशकात नवी मुंबई शहराची उभारणी झाली. रोजगार, पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध विकासामुळे शहर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. ऐरोली, घणसोली, नेरूळ परिसरात आयटी कंपन्यांची मोठ्या प्रमाणावर उभारणी झाली आहे. त्यामुळे देशभरातून हजारो आयटी व्यावसायिक, कर्मचारी, कामगार नवी मुंबईत स्थायिक होत आहेत. परिणामी, घरांची मागणी प्रचंड वाढली आहे. तसेच शहरात सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांनीही भाड्याच्या घरांच्या बाजारपेठेला चालना दिली आहे. जुन्या इमारती पाडून नवीन प्रकल्प उभारल्याने अनेक रहिवाशी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने घरे घेत आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश रहिवासी मूळ परिसर सोडण्यास तयार नसल्याने घर शोधण्याची स्पर्धा वाढली आहे. यामुळे मागणी, पुरवठामध्ये मोठी तफावत असल्याने सहा ते सात वर्षांत घरभाड्यांमध्ये दुपटीने वाढ झाली आहे.
--------------------------------
वाशी, पाम बीच रोड, सीवूड
या प्रमुख भागांमध्ये वन बीएचकेसाठी ३० ते ३५ हजार रुपये, तर टू बीएचकेसाठी ४० हजार रुपयांपेक्षा अधिक भाडे आकारले जाते. सुविधांयुक्त सदनिकांमध्ये हेच भाडे पाच ते सहा हजारांनी वाढते.
---------------------------
ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे
या परिसरात वन बीएचकेसाठी २० ते २५ हजार रुपये भाडे आकारले जात असून, कोपरखैरणे परिसरात १५ ते १६ हजार रुपये मासिक भाडे घेतले जात आहे. पूर्वी सहा ते सात हजार रुपयांमध्ये मिळणारी घरे दुप्पट दराने वाढली आहेत. रबाळे, तुर्भे भागात तुलनेने भाडे कमी असले तरी सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
------------------
आर्थिक ताण
झोपडपट्टी, गावठाण भागात भाडेवाढ जाणवत आहे. पूर्वी पाच ते सहा हजार रुपयांमध्ये मिळणारी घरे आठ ते १० हजार रुपयांपर्यंत पोहोचली आहेत. झोपडपट्टीतील वन रूम किचनसाठी पाच ते सात हजार रुपये भाडे आकारले जाते, तर ११ महिन्यांचा करार संपल्यानंतर घरमालक नवीन भाडेकरूला तीन ते पाच हजार रुपयांची वाढ करतो. नियमाने १० टक्के भाडेवाढ अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यापेक्षा अधिक वाढ केली जात आहे.
------------------
दलालांचे वर्चस्व
या संपूर्ण प्रक्रियेत अतिरिक्त खर्च वाढत आहे. घर भाड्याने घेताना सोसायटी शुल्क, शिफ्टिंग चार्जेस अशा विविध नावाखाली भाडेकरूंना अतिरिक्त रक्कम मोजावी लागते. वाढती महागाई, कर्जाचे हप्ते, गुंतवणुकीवरील परतावा, वाढती मागणीमुळे घरमालक भाडेवाढ करण्यास प्रवृत्त होत आहेत. पुनर्विकासामुळे निर्माण झालेली तात्पुरती मागणी, आयटी क्षेत्राच्या विस्तारामुळे पुढील काही वर्षांतही भाडेदर कमी होण्याची शक्यता कमी आहे.
-------------------------
आयटी क्षेत्राचा विस्तार, पुनर्विकासामुळे घरांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. उपलब्ध घरे मर्यादित असल्याने भाडेवाढ अपरिहार्य ठरते. घरमालकांवरही कर्जाचे हप्ते आणि गुंतवणुकीचा ताण असतो.
- शुभांगी गायकवाड, इस्टेट एजंट
---------------------
दरवर्षी करार संपल्यानंतर भाड्यात मोठी वाढ केली जाते. नियमाने १० टक्के वाढ अपेक्षित असताना प्रत्यक्षात तीन ते चार हजार रुपये किंवा अधिक वाढ होते. भाडे परवडत नसले तरी डोक्यावर छप्पर नसल्याने मान्य करावे लागते.
- सागर कांबळे, रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.