

‘अवैध प्रवासी वाहतुकी’चे बळी
मुरबाड-कल्याण मार्ग बनला मृत्यूचा सापळा
मुरलीधर दळवी ः सकाळ वृत्तसेवा
मुरबाड, ता. १३ ः रायते पुलावर सोमवारी (ता. १३) सकाळी झालेल्या भीषण अपघातात ११ निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला. हा अपघात कसा घडला, याचा तपास होईल. मात्र, यानिमित्ताने मुरबाड-कल्याण मार्गावरील अवैध वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एसटीच्या अपुऱ्या फेऱ्या, लालफितीत अडकलेली रेल्वे यामुळे येथील रहिवाशांना प्रवासासाठी खासगी लाल-पिवळ्या पिकअप व्हॅनवर अवलंबून राहावे लागते. सहा आसन क्षमता असतानाही गुराढोरांप्रमाणे व्हॅनमध्ये प्रवाशांना कोंबले जाते.
मुरबाड-कल्याण मार्गावर वर्षानुवर्षे ही अवैध वाहतूक सुरू असून, दररोजच्या धोकादायक प्रवासाचा शेवट मृत्यूत होणार असेल, तर प्रशासन आतातरी लक्ष देणार का, असा प्रश्न अपस्थित होत आहे. मुरबाड-कल्याण मार्गावर दररोज शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून प्रवास करतात. काळ्या-पिवळ्या गाड्या, ईको आणि जीपमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक केली जाते. दररोज सुमारे १००-१२० बेकायदा गाड्या या मार्गावर धावत असून, प्रत्येकी तीन फेऱ्या मारतात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, वेगाने वाहन चालवणे, कोणतीही तपासणी नसणे, हेच रोजचे चित्र.
कोणतीही सुरक्षा नाही, नियंत्रण नाही, नियमांची अंमलबजावणी नाही. अशा परिस्थितीत हा मार्ग अक्षरशः ‘मृत्यूचा ट्रॅक’ बनला आहे. सोमवारी झालेल्या अपघातातही हेच वास्तव समोर आले. सहा आसनी इको गाडीमध्ये १२ प्रवासी भरण्यात आले होते. डम्परला धडक लागल्याने क्षणात या व्हॅनमधील ११ जीव गेले. या अपघातात बहुसंख्य प्रवासी मुरबाड तालुक्यातील आहेत. मृतांमध्ये तालुक्यातील पऱ्हे गावातील दोन मुले व एका मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण मुरबाड तालुक्यात शोककळा पसरली आहे. हा केवळ अपघात नसून व्यवस्थेने घेतलेला बळी असल्याची प्रतिक्रिया आता उमटू लागली आहे.
आजपासून एक फेरी वाढणार
मुरबाड-कल्याण मार्गावर सध्या मुरबाड आगारातर्फे तीन, तर विठ्ठलवाडी आगारातर्फे तीन परिवहनच्या बस चालवण्यात येत आहेत. यामध्ये उद्यापासून आणखी प्रत्येकी एक गाडीची वाढ करण्यात येईल, अशी माहिती मुरबाड आगार व्यवस्थापक योगेश मुसळे यांनी दिली.
एसटीसेवा अपुरी
या मार्गावर राज्य परिवहनच्या बस अत्यंत अपुऱ्या आहेत. मुरबाड आणि विठ्ठलवाडी आगारातून मिळून मोजक्याच फेऱ्या होत असल्याने हजारो प्रवासी वाऱ्यावर आहेत. परिणामी, बेकायदा वाहतूक हीच ‘गरज’ बनली आहे. याचाच फायदा घेत काळी-पिवळी व्हॅनची ‘चलती’ येथे पाहायला मिळते. सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत या व्हॅन उपलब्ध असल्याने कल्याण-मुरबाड मार्गावरच नव्हे, तर अंतर्गत वाहतुकीसाठीही त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
दररोज १०० ते १५० गाड्यांंमधून अवैध वाहतूक होत असतानाही वाहतूक पोलिस आणि आरटीओचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. यामधील बहुतेक व्हॅन या कालबाह्य झाल्या असून, भंगार अवस्थेत प्रवाशांचा जीव धाक्यात घालून त्यांचा वापर केला जात आहे. आता या अपघातानंतर त्यामागील कारणांची चौकशी करण्याचे आदेश परिवहनमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे उद्यापासून या पिकअप व्हॅनच्या फिटनेससह प्रवासीसंख्येची झाडाझडती सुरू होण्याची शक्यता आहे.
स्वतंत्र वाहतूक विभागाची गरज
ठाणे ग्रामीण पोलिस हद्दीत मुरबाड, शहापूर, वासिंद, किन्हवली, कसारा, टोकावडा, पडघा, भिवंडी ग्रामीण, गणेशपुरी, कुळगाव-बदलापूर आणि कल्याण तालुका (टिटवाळा) अशी तब्बल ११ पोलिस ठाण्यांची व्याप्ती असली तरी या संपूर्ण पट्ट्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभागच अस्तित्वात नाही, ही अत्यंत गंभीर बाब समोर येत आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि दैनंदिन वाढती वाहनसंख्या यामुळे या भागातील रस्ते आधीच ताणले गेले आहेत. बाजारपेठा, शैक्षणिक परिसर आणि महामार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांवर दररोज वाहतूक कोंडीचे चित्र दिसत असून, नियोजनाच्या अभावामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.
वाहतूक विभागाची डोळेझाक
कल्याण-मुरबाड मार्गावरील अवैध प्रवासी वाहतुकीने अक्षरशः उग्र रूप धारण केले आहे. या मार्गावर किमान ५५ इको आणि ८ एर्टिगा प्रवासी गाड्या नियम धाब्यावर बसवून धावत असल्याची माहिती समोर आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून, कोणतीही सुरक्षा न पाळता आणि जीव धोक्यात घालून ही वाहतूक सर्रास सुरू असते. मात्र, संबंधित वाहतूक यंत्रणा याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा संतप्त आरोप नागरिक करत आहेत.
एका लेनवरून सुरू होती वाहतूक
अपघात घडलेला परिसर हा सध्या रस्ते दुरुस्तीखाली असून, वाहतूक फक्त एका लेनवरून चालू होती. अशा धोकादायक परिस्थितीत, प्रवाशांनी खचाखच भरलेली इको गाडी ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या मिक्सर ट्रकवर आदळली आणि काही क्षणांतच मृत्यूचे तांडव घडले. ही घटना केवळ अपघात नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेची, अवैध वाहतुकीच्या बेफाम वाढीची आणि दुर्लक्षित सुरक्षा व्यवस्थेची भीषण परिणती असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.