

सलग दुसऱ्या दिवशी वसई-भाईंदर रो-रो फेऱ्या रद्द
तांत्रिक बिघाडामुळे संध्याकाळच्या फेऱ्या बंद; प्रवाशांची गैरसोय
विरार, ता. १३ (बातमीदार) : वसई-भाईंदरदरम्यान सुरू असलेल्या रो-रो फेरीबोटींच्या संध्याकाळच्या फेऱ्या सलग दुसऱ्या दिवशीही रद्द करण्यात आल्या. तांत्रिक बिघाडामुळे या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती संबंधित फेरीबोट चालवणाऱ्या कंपनीकडून देण्यात आली.
महामार्ग आणि लोकल रेल्वेनंतर वसई-भाईंदरला जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग म्हणजे रो-रो फेरीसेवा. कमी वेळेत आणि तुलनेने जलद प्रवास होत असल्याने या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीमार्फत फेरी बोटी चालवल्या जातात. या फेरी बोटींत ३३ वाहने आणि १०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार, या सेवेच्या वेळापत्रकात अलीकडेच कायमस्वरूपी बदल करण्यात आले होते. १ एप्रिलपासून नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले असून, विशेषतः दुपारनंतरच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे; मात्र रविवार आणि सोमवार या दोन्ही दिवशी संध्याकाळच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. वसईहून सायंकाळी ६ वाजता सुटणारी आणि भाईंदरहून सायंकाळी ७ वाजता सुटणारी फेरी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी या सेवेला प्राधान्य देणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. दरम्यान, फेरीबोटींच्या दुरुस्तीचे काम सुरू असून, तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर सेवा पूर्ववत करण्यात येईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.