

भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : कामगारांचे शहर म्हणून ओळख असलेल्या भिवंडीत यंत्रमाग व कापड उद्योगात लाखो कामगार कार्यरत आहेत. यामध्ये देशातील विविध भागांतून रोजगारासाठी आलेल्या कामगारांचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्योगातील मंदी वाढत आहे. रोजगारावर परिणाम होत असून कामगारांचे स्थलांतर वाढू लागले आहे. परिणामी, उत्पादन ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कापड उद्योगातील मंदी आणि रोजगाराच्या अनिश्चिततेमुळे कामगारांचे मूळ गावी स्थलांतर वाढू लागले आहे. मोठ्या संख्येने कामगारांनी आपापल्या राज्यांकडे परतण्यास सुरुवात केल्याने उद्योगासमोर कामगार टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर उत्पादन पूर्णपणे ठप्प होण्याची भीती उद्योगाशी संबंधित घटकांनी व्यक्त केली आहे. जॉब-वर्क (कंत्राटी काम) पद्धतीवर चालणाऱ्या या उद्योगात पूर्वी घेतलेल्या ऑर्डर्सही सध्या तोट्याच्या ठरत आहेत. कच्च्या मालाच्या किमतीतील चढ-उतार आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे व्यापारी नवीन साठा करण्यास टाळाटाळ करत आहेत. परिणामी, नवीन मागण्यांमध्ये घट झाली असून खरेदीदारांची संख्या कमी झाली आहे. यामुळे संपूर्ण बाजारपेठ मंदीच्या छायेत गेली आहे.
दरम्यान, यंत्रमाग उद्योग अचानक बंद झाल्यास कामगार मोठ्या प्रमाणात गावाकडे परततील, अशी भीती मालकांमध्ये आहे. त्यामुळे नाईलाजाने अनेक कारखानदारांनी तोट्यातही कारखाने सुरू ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने परिस्थितीचा आढावा घेऊन यंत्रमाग उद्योगाला विशेष सवलती देण्याची मागणी छोटे व्यावसायिक व कारखानदारांकडून करण्यात येत आहे.
‘लॉकआउट’ची भीती
उद्योग प्रतिनिधींच्या मते, ही परिस्थिती कायम राहिल्यास यंत्रमाग कारखान्यांमध्ये ‘लॉकआउट’ची वेळ येऊ शकते. भिवंडीपुरतेच नव्हे, तर मालेगाव आणि इचलकरंजीसारख्या प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रांवरही याचे परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.