तीन भावंडांचा करुण अंत

तीन भावंडांचा करुण अंत
Published on

तीन भावंडांचा करुण अंत
एकल आईवर दुखाचा डोंगर; मोहपे कुटुंबावर काळाचा घाला

टिटवाळा, ता. १३ : ‘‘आई, येतो गं...,’’ असा निरोप देत सुट्टीसाठी मूळगावी निघालेल्या तीन सख्ख्या भावंडांवर नियतीने निर्दयी घाला घातला. स्नेहा मोहपे (२२), मानसी मोहपे (२०) आणि प्रथमेश मोहपे (१७) अशी मृत्युमुखी पडलेल्या भावंडांची नावे आहेत. कल्याण-मुरबाड मार्गावरील भीषण अपघातात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात या तिघांचाही समावेश आहे. ही बातमी कळताच त्यांच्या एकल आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. सुन्न अवस्थेत आई मुरबाड तालुक्यातील पऱ्हे गावात पोहोचली असून, नियतीने तिच्यावरच आपल्या तिन्ही लेकरांना अखेरचा निरोप देण्याची वेळ आणली आहे.

सोमवारी सकाळी रायते येथे इको पिकअप आणि सिमेंट मिक्सर यांच्यात भीषण धडक होऊन ११ प्रवासी जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी हंबरडा फोडत गोवेली ग्रामीण रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यात मोहपे कुटुंबीयांचाही समावेश होता. या दुर्घटनेत मोहपे कुटुंबातील तिन्ही भावंडांचा मृत्यू झाला.

मूळचे मुरबाड तालुक्यातील पऱ्हे गावचे रहिवासी असलेले हे तिघे वडिलांच्या निधनानंतर सुमारे दहा वर्षांपूर्वी आई अंजना मोहपे यांच्यासोबत ठाण्यातील दिवा येथे राहायला आले होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आईने भाड्याच्या खोलीत राहून धुणीभांडी करून मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना शिक्षण दिले. स्नेहा आणि मानसी ठाण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या, तर मोठी मुलगी नोकरीच्या उंबरठ्यावर होती. सुट्टीचा योग साधत ही तिन्ही भावंडे चार-पाच दिवसांसाठी काकांच्या घरी जाण्यासाठी सोमवारी सकाळी निघाली होती. दिवा ते कल्याण असा लोकलने प्रवास केल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी इको पिकअपचा आधार घेतला. मात्र गावी पोहोचण्याआधीच मृत्यूने त्यांना गाठले आणि एका आईचा आधार क्षणात हिरावून घेतला.

गावीच अंत्यसंस्कार
अंजना मोहपे यांनी कष्टाची परिसीमा गाठत आपल्या मुलांना मोठे केले होते. ‘‘मुलं शिकून मोठी होतील, स्वतःच्या पायावर उभी राहतील आणि माझ्या वृद्धापकाळाचा आधार बनतील,’’ अशी साधी पण मोठी अपेक्षा त्यांनी मनाशी बाळगली होती. मुलांनीही आईची स्वप्ने पूर्ण करण्याचे स्वप्न पाहिले होते आणि ते अनेकदा नातेवाइकांसमोर व्यक्तही केले होते. मात्र नियतीच्या कठोर निर्णयाने ही सर्व स्वप्ने अपूर्णच राहिली. या दुर्दैवी घटनेमुळे पऱ्हे गावावर शोककळा पसरली आहे. सायंकाळी अत्यंत जड अंतःकरणाने ही बातमी आईला देण्यात आली. दुःखाने कोसळलेली आई हंबरडा फोडत गावी पोहोचली असून, तिन्ही भावंडांवर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

़़़़
रायते पुलावर उद्‍घाटनाआधीच ११ जणांचा बळी
रायते पुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरू असून ते आता पूर्णत्वाकडे जात आहे. मात्र उद्‍घाटनापूर्वीच या पुलावर ११ जणांचा बळी गेला आहे. प्राथमिक माहितीनुसार, पुलाच्या कामामुळे एक मार्गिका बंद होती आणि दोन्ही बाजूंची वाहतूक एकाच मार्गावरून सुरू होती. याचदरम्यान ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात इको पिकअपची सिमेंट मिक्सरशी धडक झाली.
या अपघातानंतर अवैध प्रवासी वाहतूक आणि सिमेंट मिक्सर वाहनांच्या वाढत्या वर्दळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com