

वराहपालन व्यवसायाला नवी दिशा
कृषी विद्यालयाच्या मार्गदर्शनाने लाखोंचा नफा
वाणगाव,ता. १४ (बातमीदार) : पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन या पारंपरिक व्यवसायांच्या जोडीला सध्या कमी खर्चात, कमी जागेत, आर्थिक स्थैर्य देणारा ‘वराहपालन’ हा एक व्यवसाय नावारुपास येत आहे. तलासरी येथील तरुण अनिकेत सोनवाल यांनी आसनगावच्या कृषी तंत्र विद्यालयातून कृषी विषयात पदविका घेतली. नंतर कृषी विद्यालयाचे मार्गदर्शनाने स्वतःच्या मालकीची जमीन नसतानाही भाडेतत्त्वावर जागा घेत वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी वराहपालन व्यवसाय सुरू केला. यातून ते वर्षाकाठी तब्बल ३० लाखांपेक्षा अधिक नफा मिळवत आहेत. त्यामुळे वराहपालन व्यवसायाने जीवनाला नवी दिशा दिली आहे. पारंपरिक शेतीला वराहपालनाची जोड दिल्यास निश्चितच शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीत भर पडेल, असे वराहपालक अनिकेत सोनवाल यांनी सांगितले.
वराहपालन हा व्यवसाय मांसविक्रीच्या दृष्टीने करावयाचा असल्याने वराहाच्या शरीरात भरपूर प्रमाणात फॅटचे प्रमाण वाढविणे आवश्यक असते. अशावेळी तेलकट पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे असते. हॉटेलमधील उष्टांन खाद्य, मेस, ढाबे, वस्तीगृह, लग्नप्रसंगमधील उरलेले अन्न, निरोपयोगी खाद्यपदार्थ, भाजीपाला इत्यादींचा खाद्यामध्ये फॅट निर्मितीसाठी समावेश करणे आवश्यक आहे. या खाद्याचा खर्च खूपच कमी असून, योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास खर्च कमी आणि नफा जास्त होतो, त्यामुळे इतर शेतीपूरक व्यवसायांपैकी हा एक व्यवसाय फायदेशीर ठरत आहे.
विक्रीतून आर्थिक फायदा
वराह मादी वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते. पिल्ले साधारणतः सहा ते सात महिन्यांनी विक्रीसाठी तयार होतात. नियोजनबद्ध संगोपन केल्यास एका सहा ते सात महिन्यांच्या वराहाचे सरासरी वजन ८० ते ९० किलो भरते. वर्षाकाठी सरासरी १५ टन वराहाची विक्री झाली. खर्च वजा करता निव्वळ ३० लाख रुपयांचा नफा झाला आहे, असे वराहपालक अनिकेत सोनवाल यांनी सांगितले आहे.
----------------
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वराहाला प्रचंड मागणी असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वराहपालनाकडे प्रमुख व्यवसाय म्हणून पाहिले पाहिजे. नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न लागता नियोजनबद्ध वराहपालन व्यवसाय सुरू करावा आणि आपली आर्थिक स्थिती बळकट करावी.
- अनिकेत सोनवाल, वराहपालक, आसनगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.