भिवंडी-वाडा महामार्गांची दुरवस्था

भिवंडी-वाडा महामार्गांची दुरवस्था
Published on

वज्रेश्वरी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडी-वाडा आणि अंबाडी-शिरसाड हे दोन्ही महत्त्वाचे महामार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खड्डे, धूळ आणि अपूर्ण कामांमुळे हे रस्ते अक्षरशः अपघातांचे केंद्र बनले आहेत.
भिवंडी-वाडा आणि अंबाडी-शिरसाड या महामार्गांची स्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून, खड्ड्यांमुळे वाहने वारंवार बंद पडत आहेत. याशिवाय, धुळीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात घडत असून निष्पाप नागरिकांचे जीवही जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तरीही संबंधित यंत्रणा या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्यांना ठेकेदाराशी संबंधित काही घटकांकडून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे अनेक जण भीतीपोटी गप्प बसत असल्याची खंत भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी व्यक्त केली. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या संदर्भात भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तू गिते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

रस्त्याच्या मध्यभागी एसटी बंद
वारेट येथे दोन दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी एसटी बस बंद अवस्थेत उभी असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भूमिपुत्र एल्गार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी घटनास्थळी भेट देत प्रशासन व ठेकेदारावर तीव्र संताप व्यक्त केला. संबंधित विभागाने ही बस तत्काळ हटवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोन दिवसांपासून भिवंडी-वाडा महामार्गावर वारेट येथे एसटी बस बंद अवस्थेत उभी आहे. ती हटवण्यासाठी संबंधित विभागाकडे वेळ नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. जोपर्यंत रस्त्यांची स्थिती सुधारत नाही आणि अपघात थांबत नाहीत, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.
- प्रमोद पवार, संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र एल्गार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com