

पोटासाठी दिवसभर दगडावर घाव
छत्रपती संभाजीनगरमधील पाथरवट पालघरमध्ये दाखल
पालघर, ता. १४ ः शहरात रस्त्याच्या कडेला काळ्या दगडाचे पाटे-वरवंटे, जाते, खलबत्त्याची विक्री होते. या माध्यमातून एकीकडे काळाच्या ओघात नष्ट होत असलेली कला जोपासण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे पोटासाठी दिवसभर दगडावर घाव घालून कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे.
दगडी साहित्यांपासून चरितार्थ चालवण्यासाठी सध्या अनेक कुटुंबे छत्रपती संभाजीनगर येथून पालघर जिल्ह्यात आली आहेत. दगडी साहित्य विक्री करण्यासाठी कुटुंबे आली असली तरी लुप्त होत असलेली दगडी संस्कृती जपण्यासाठी त्यांची धडपड दिसून येते. मुळात, वडार समाजाचा हा वडिलोपार्जित व्यवसाय असला तरी जुनी संस्कृती टिकवण्यासाठी वारसा पुढे सुरू ठेवण्याची धडपड सुरू आहे.
-----------------------
पाच महिन्यांचे अविरत श्रम
खदाणीतून दगड काढून त्याला आकार देण्यासाठी त्याचे भाग करावे लागतात. त्यानंतर दगडी भागांना गोल, चौकोनी, आयताकृती, लांबट ढोबळ आकार दिला जातो. त्यानंतर दगडातून विविध साहित्य तयार केले जाते. दगड काढण्यापासून घडवण्यापर्यंत पाच महिने मेहनत घ्यावी लागते, असे पाथरवट सांगतात. दगडी साहित्य घडवण्यासाठी पती-पत्नी एकत्रित मेहनत घेतात.
--------------------
उत्सुकतेचा विषय
दगडी पाटा-वरवंटा घडवण्यासाठी अर्धा दिवस जातो. दोन जण दिवसाला तीन ते चार पाटे-वरवंटे घडवतात. खलबत्ता बनवण्यासाठी मेहनत जास्त असल्याने दिवसाकाठी जेमतेम एक ते दोन तयार होतो, तर जाते बनवण्यासाठी दिवस जातो. दिवसभर वजनदार हातोड्याने दगडावर घाव घालून दगड घडवण्याची किमया पाहण्यासाठी नागरिक येत आहेत.
------------------------
आरोग्याला लाभदायक
खलबत्ते साधारणतः तीनशे रुपयांपासून पुढे आहेत. आकारानुसार त्याचे वेगवेगळे दर आहेत. पाटे, वरवंटा, जाते यांच्या आकारमानावर किमती असतात. दगडी पाटे वरवंटा, खलबत्ते यातून तयार केलेल्या वाटपाला मिक्सर व इतर यंत्रांची चव नाही. शिवाय दगडी साहित्याच्या वापरातून लोह खनिज शरीराला काही प्रमाणात मिळते. त्यामुळे ही साहित्य आरोग्यदायी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.