देवनार कचराभूमी स्वच्छतेचा मार्ग मोकळा

देवनार कचराभूमी स्वच्छतेचा मार्ग मोकळा
Published on

देवनार कचराभूमी स्वच्छतेचा मार्ग मोकळा
सीआरझेड मंजुरीनंतर वैज्ञानिक विल्हेवाटीस गती; रहिवाशांना दिलासा
जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १४ ः किनारी नियमन क्षेत्र (सीआरझेड) मंजुरी मिळाल्यामुळे देवनार कचराभूमीवरील वर्षानुवर्षे साचलेल्या कचऱ्याच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दीर्घकाळ भेडसावणाऱ्या गंभीर समस्येतून सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे.
देवनार येथील कचराभूमी सुमारे १२५ वर्षांहून अधिक जुनी असून, ती तब्बल ३११ हेक्टर क्षेत्रावर पसरलेली आहे. दररोज सुमारे ५,५०० टनहून अधिक कचरा येथे जमा होतो. या प्रचंड कचऱ्यामुळे चेंबूर, गोवंडी आणि मानखुर्द परिसरातील रहिवाशांना अनेक वर्षांपासून विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.
या कचराभूमीत वारंवार लागणाऱ्या आगींमुळे विषारी वायू वातावरणात पसरतो, ज्याचा नागरिकांच्या जीवनावर तसेच उपजीविकेवर मोठा दुष्परिणाम होतो. देवनार कचराभूमीची अत्यंत प्रदूषित क्षेत्र म्हणून ओळख आहे.
सीआरझेड मंजुरीनंतर या ठिकाणी साचलेल्या जुन्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आगीच्या घटनांमध्ये घट होईल, वायू प्रदूषण कमी होईल आणि स्थानिकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर कायमस्वरूपी उपाय होण्यास मदत होईल.
बाबानगर, रफिकनगर, शिवाजीनगर, मानखुर्द, लल्लूभाई कम्पाउंड, साठेनगर आणि चेंबूर परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार, त्वचारोग, डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी तसेच कॅन्सरसारख्या आजारांचा आजही सामना करावा लागत आहे.
विशेषतः उन्हाळ्यात आग लागण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे या कचराभूमीमुळे नागरिकांच्या आयुष्यात सतत भीती आणि आजारांची धास्ती असते.
एकंदरीत सीआरझेड मंजुरीमुळे देवनार कचराभूमीत साचलेल्या जुन्या कचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावली जाणार असून, देवनार कचराभूमीच्या छायेत आयुष्य जगणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय केवळ पर्यावरणीय दिलासा नसून, अधिक सुरक्षित, निरोगी आणि सन्मानजनक जीवनाची नवी संधी ठरणार आहे.

गरिबीमुळे आम्हाला येथेच राहावे लागले आणि या प्रदूषणातच जीवन कंठावे लागले. मात्र जर ही स्वच्छता प्रत्यक्षात झाली तर आमचे आयुष्य नक्कीच बदलून जाईल.
- नरेश केदारे, कार्यकर्ते

स्वच्छता प्रकल्पात पारदर्शकता आणि नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. प्रदूषणामुळे आजारी पडलेल्या कुटुंबांना रोजगाराची संधी दिली पाहिजे. प्रकल्पात विलंब किंवा अनियमितता झाल्यास आम्ही आवाज उठवू.
- ॲड. फैयाज आलम शेख, सामाजिक कार्यकर्ते

अनेक वर्षे आम्ही या समस्यांमध्ये अडकून पडलो होतो. आता या गर्तेतून बाहेर पडण्याची आशा निर्माण झाली आहे.
- सुजाता केंजळे, स्थानिक रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com