भात शेतीसोबत नाचणीचे आंतरपीक ठरतेय फायदेशीर

भात शेतीसोबत नाचणीचे आंतरपीक ठरतेय फायदेशीर
Published on

खरीप हंगामात नाचणीमुळे लाभ
डहाणूतील शेतकऱ्यांचा आंतरपीकांकडे कल
कासा, ता. १४ (बातमीदार)ः डहाणू तालुक्यात भातशेतीसोबत आंतरपीक म्हणून नाचणीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे. या पिकातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे चित्र आहे. उन्हाळीपूर्वी नाचणीच्या पोषणमूल्यांची माहिती नसल्याने व्यापारी शेतकऱ्यांकडून कमी किमतीत धान्य घेऊन जात होते. मात्र, सध्या परिस्थिती बदलली असून, नाचणीचे आहारातील महत्त्वामुळे शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच बाजारपेठेसाठी नाचणीची लागवड करू लागले आहेत. डहाणू तालुक्यातील चिंचणी परिसर, वाणगाव मंडळात प्रगतशील शेतकरी जगन्नाथ जावे यांनी भातशेतीसोबतच नाचणीचे आंतरपीक घेतले असून, एका एकरातून सुमारे १८ ते २० क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
--------------------------
आरोग्याच्या दृष्टीने फायदे
-नाचणी हे अत्यंत पौष्टिक अन्न आहे. त्यामध्ये कॅल्शियम, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॉस्फरस आणि विविध जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. तांदूळ, गहू आणि ज्वारीपेक्षा नाचणी पोषक आहे.
- नाचणीची आंबील ही पचायला हलकी असल्याने आजारातून सावरणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरते. तसेच हाडे, दात मजबूत ठेवते. वजन नियंत्रण आणि मधुमेहावर नियंत्रणात नाचणी उपयुक्त असते.
-------------------
उत्पन्नवाढीस मदत
चिंचणी, वाणगाव, साखरा, नाणीवली, तवा, सायवन, बापूगाव, सुकट आंबा, दिवशी, दाभाडी आदी भागातील शेतकरी विविध आंतरपीक पद्धतींचा अवलंब करत आहेत. शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामुळे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड मिळाल्याने उत्पन्न वाढण्यास मदत होते.
---------------------
शेतकरी भातपिकासोबत विविध आंतरपीक घेत आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहोत. तसेच शासनाच्या विविध योजना पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- अनिल नरगुलकर, कृषी अधिकारी

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com