

स्वच्छता उपक्रमालाच तडा
लहान कचराकुंडी चोरीला; पालिकेचा लाखोंचा खर्च वाया
वाशी, ता. १४ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या लहान कचराकुंड्यांचा (लिटल बिन्स) गैरवापर आणि चोरीचे प्रकार समोर येत आहेत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यावर आळा घालण्यासाठी बसवण्यात आलेल्या या लिटल बिन्स काही ठिकाणी मोठ्या कचराकुंड्यांमध्ये रूपांतरित झाल्या आहेत, तर काही ठिकाणी थेट चोरीलाही जात असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे स्वच्छतेच्या उपक्रमालाच तडा जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पालिकेद्वारे शहरभरात ५०० हून अधिक लिटल बिन्स बसवून कचराकुंडीमुक्त शहराची संकल्पना राबवण्यात आली. मात्र या बिन्सच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरून जाताना किरकोळ कचरा टाकण्यासाठी या बिन्स जागोजागी बसविण्यात आल्या, परंतु काही नागरिक घरगुती कचरादेखील त्यात आणून टाकत असल्याने त्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. परिणामी परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी निर्माण होत आहे. याशिवाय काही ठिकाणी समाजकंटकांकडून या लिटल बिन्स चोरी करण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून उभारलेली ही यंत्रणा वाया जात असल्याची खंत व्यक्त होत आहे. या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
नागरिकांचे सहकार्य आवश्यक
१. पालिकेच्या एका स्वच्छता अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले, की लिटल बिन्स सार्वजनिक ठिकाणी कचरा जमा करण्यासाठी बसवण्यात आल्या आहेत. मात्र काही जण त्यामध्ये घरगुती कचरा टाकत असल्याने त्या लगेच भरल्या जातात. तसेच काही ठिकाणी चोरीचे प्रकारही घडत आहेत.
२. घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त डॉ. अजय गडदे यांच्याशी संपर्क साधला असता, स्वच्छ सर्वेक्षणात शहराचे अव्वल स्थान कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच घरगुती कचरा नियोजित वेळेत येणाऱ्या कचरागाडीतच टाकावा आणि लिटल बिन्सचा योग्य वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.