

ठाणे, ता. १४ (बातमीदार) : ‘मया भीमानं माय सोन्यानं भरली ओटी’ असा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत मंगळवारी (ता. १४) ठाणे शहर निळ्या जल्लोषात रंगून गेले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण शहरात उत्साह, अभिमान आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. शहरातील विविध ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची अलोट गर्दी उसळली होती.
ठाण्यात ६४ मिरवणुकांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कोर्ट नाका, ठाणे रेल्वे स्थानक परिसर, खोपट, कोपरी आनंदनगर, कळवा आणि खारेगाव या भागांत मिरवणुका काढण्यात आल्या. डीजे, बाईक रॅली, पारंपरिक गीते आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले. या वेळी ज्येष्ठांपासून लहान मुले मोठ्या उत्साहाने पायी चालत व दुचाकीवर स्वार होऊन संविधान रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. निळा फेटा, महिलांची पांढरी साडी, पुरुषांचा पांढरा शर्ट आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील लहान मुले-मुली संविधान रॅलीतील आकर्षणाचे मुख्य केंद्रबिंदू ठरले.
संविधान मूल्यांचा जागर
भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय केळकर यांच्या संकल्पनेतून ठाण्यात ‘भव्य संविधान गौरव रॅली’ मोठ्या उत्साहात काढण्यात आली. सलग तिसऱ्या वर्षीही रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या वेळी आमदार निरंजन डावखरे आणि उपमहापौर कृष्णा पाटील उपस्थित होते. सकाळी ९ वाजता भाजप खोपट कार्यालयातून रॅलीला सुरुवात झाली. डॉ. आंबेडकर रोड, सिव्हिल हॉस्पिटल, कोर्ट नाका संविधान चौकमार्गे रॅली पुढे सरकली. संविधान चौक व ठाणे स्थानक येथील स्मारकावर पुष्पवृष्टी करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. कार्यकर्ते, नागरिक व तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी होता. संविधानाच्या मूल्यांची जनजागृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला.
ठाण्यात बौद्ध भंतेंची उपस्थिती
दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजीराजे, म. फुले, राजर्षा शाहू महाराज, डॉ. आंबेडकर समितीचे अध्यक्ष कर्मवीर सुनील खांबे यांच्या हस्ते ठाण्याच्या कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कोर्ट नाका परिसर विद्युत रोषणाईने उजळून गेला होता. महामानवाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांनी एकच गर्दी केली होती. डॉ. आंबेडकर यांचा पुतळा, प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर भंतेंनी समस्त बौद्ध समाज बांधवांसमवेत बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीने कोर्ट नाका परिसर दणाणून गेला. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी समितीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.