

ठाणे, ता. १४ : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळूनही विषय समित्यांची स्थापना अद्याप न झाल्याने भाजप आमदार संजय केळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापौर आणि उपमहापौर पदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर दीड महिना उलटूनही समित्या स्थापन न झाल्याबाबत त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खंत व्यक्त केली. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.
ठाण्यातील कोर्ट नाका परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केळकर यांनी अभिवादन केले. यानंतर बोलताना त्यांनी सांगितले, दरवर्षीप्रमाणे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. हा महामानवाला अभिवादन करण्याचा एक महत्त्वाचा मार्ग असून त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे आमदार केळकर यांनी अधोरेखित केले. इंदू मिल येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या मताचा उल्लेख करत केळकर म्हणाले, पूर्वी जे घडले नव्हते ते आता होत आहे, ही बाब महत्त्वाची आहे. देशासह जगभरात बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण आणि प्रसार होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. राज ठाकरे यांच्या समाज माध्यमांवरील पोस्टविषयी बोलताना केळकर यांनी सांगितले, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. मात्र, बाबासाहेबांनी दिलेले विचार आणि त्यांनी केलेले प्रबोधन हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्याच आधारे विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, निवडणुका होऊनही समित्या स्थापन करण्यात विलंब होत असल्याचे सांगत, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ठाणे महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही समित्या लवकर स्थापन व्हायला हव्यात, असे ते म्हणाले.
तपशीलवार लेखापरीक्षण
महापालिकेच्या लेखापरीक्षणवरही केळकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण झाले असले तरी सर्व विभाग आणि विशेषतः महापालिकेच्या मालमत्तांचा सविस्तर आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्या मालमत्तेचा ताबा कोणाकडे आहे, त्याचा वापर कशासाठी केला जात आहे आणि त्यातून नागरिकांना काय फायदा होतो, याचा तपशीलवार लेखापरीक्षण व्हावे, अशी त्यांची मागणी आहे.
एसआयआर मोहिमेत सहभाग घेण्याचे आवाहन
मतदार नोंदणीसाठी सुरू असलेल्या एसआयआर मोहिमेंतर्गत पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरेल, असा विश्वास केळकर यांनी व्यक्त केला. या मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.