

वज्रेश्वरी, ता. १४ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा यात्रोत्सव १६ ते १९ एप्रिल या कालावधीत साजरा करण्यात येणार असून, परिसरात धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यात्रोत्सवाची सुरुवात गुरुवारी (ता. १६) होणार आहे. रात्री साडेनऊ वाजता दीपपूजा होणार असून, दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. १७) सकाळी साडेसात वाजता देवीची महापूजा मोठ्या भक्तिभावात पार पडणार आहे. या यात्रेतील प्रमुख आकर्षण असलेला पालखी सोहळा शनिवारी (ता. १८) मध्यरात्री १२ वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सोहळ्यासाठी हजारो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या यात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात विविध दुकाने, पाळणे आणि अन्य सुविधा उभारण्यात येत असून, प्रशासनाकडून सुरक्षा व व्यवस्थेची विशेष काळजी घेतली जात आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थानचे परंपरागत विश्वस्त धनेश गिरी गोसावी यांनी केले आहे.