

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबईतील पाणथळ जागांवर दरवर्षी हजेरी लावणाऱ्या आकर्षक फ्लेमिंगो पक्ष्यांचे यंदाचे आगमन अखेर सुरू झाले असून, निसर्गाचा ‘गुलाबी उत्सव’ सुरू झाल्याने शहरातील निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी (ता. १४) नेरूळ परिसरातील ‘एनआरआय’ आणि ‘टीएस चाणक्य’ येथील जलक्षेत्रांमध्ये फ्लेमिंगोंचा पहिला थवा उतरल्याचे दिसून आले. यामुळे बहुप्रतीक्षित फ्लेमिंगो हंगामाची अधिकृत सुरुवात झाल्याचे मानले जात आहे.
सुमारे पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हे पक्षी प्रत्यक्षात पाणथळ जागांवर स्थिरावल्याने स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. यापूर्वी दोन दिवस हे पक्षी आकाशात घिरट्या घालताना दिसत होते; मात्र ते खाली उतरत नसल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली होती. आमची प्रतीक्षा अखेर संपली. फ्लेमिंगोंचा पहिला थवा पाहणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे, अशी भावना एनआरआय संकुलातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच, फ्लेमिंगोंच्या आगमनामुळे नवी मुंबईत पुन्हा एकदा निसर्गाचा ‘गुलाबी उत्सव’ रंगणार असून, पर्यावरण संवर्धनाची गरजही यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
दीर्घकाळ मॉन्सून सक्रिय राहिल्याचा फटका
यंदा फ्लेमिंगोंच्या आगमनास झालेला विलंब हा नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पक्षीनिरीक्षण तज्ज्ञ डॉ. अरुण कुरहे यांच्या मते, यंदा दीर्घकाळ मॉन्सून सक्रिय राहिल्याने कच्छचे रण येथे पाण्याची पातळी जास्त काळ टिकून राहिली. त्यामुळे फ्लेमिंगोंचे मुख्य खाद्य असलेल्या शेवाळाची मुबलक वाढ झाली आणि पक्षी तेथेच थांबून राहिले. जेव्हा त्या भागात अन्नाची उपलब्धता कमी होऊ लागते, तेव्हा हे पक्षी स्थलांतर करतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
बदलत्या पर्यावरणीय स्थितीचा परिणाम
स्थलांतराच्या पद्धतींचे अभ्यासक सुनील अग्रवाल यांनीही या विलंबाला सामान्य प्रक्रिया असल्याचे सांगितले. त्यांनी नागरिकांना फ्लेमिंगोंच्या स्थलांतराबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. तथापि, या आनंदाच्या पार्श्वभूमीवर काही चिंतादेखील व्यक्त होत आहेत. नेरूळमधील डीपीएस तलावाची दिवसेंदिवस खालावत चाललेली पर्यावरणीय स्थिती भविष्यातील फ्लेमिंगोंच्या संख्येवर परिणाम करू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. जल प्रदूषण आणि अधिवास नष्ट होण्याच्या समस्या तातडीने सोडवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.