आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात

आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात
Published on

आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा सन्मान

विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) : आदिवासी संघर्ष समिती, विक्रमगड यांच्या वतीने तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी गुणगौरव समारंभ पार पडला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला.

या समारंभात शैलेंद्र बाबल्या भावर (सहाय्यक वन संरक्षक), तसेच छाया बारकू रिंजड (कर सहाय्यक) या दोघा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, तर इतर विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. आदिवासी कार्यशक्ती समितीचे अध्यक्ष डॉ. संदीप वलकर, माजी अध्यक्ष राहुल धूम तसेच वारली समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय पांडुरंग भुयाळ यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विक्रमगड येथील तारपा चौकात पार पडलेल्या या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना कठोर परिश्रम, जिद्द आणि योग्य मार्गदर्शन यांच्या बळावर कोणतीही स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या पार करता येते, असा विश्वास व्यक्त केला. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्राथमिक स्तरावर मार्गदर्शन करणाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. तसेच आदिवासी कार्यशक्ती समितीचे जगन्नाथ चापके इत्यादी मान्यवरही उपस्थित होते.
समारंभाला पंचक्रोशीतील मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहिले होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आदिवासी संघर्ष समितीचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळून भविष्यात अधिकाधिक तरुण स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com