

२० वर्षांपासून वापराविना वरसोली खाडीवरील पूल
जोडरस्त्याअभावी कोट्यवधींचा प्रकल्प ठप्प; बांधकाम विभागाने रस्ताच केला रद्द
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १५ : वरसोली आणि थळ परिसरातील किनारपट्टीलगतच्या नागरिकांना दळणवळण सोयीचे व्हावे म्हणून साधारण २० वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून खाडी पूल बांधण्यात आला, परंतु या पुलाला जोडरस्ते बांधण्याचे काम बांधकाम विभागाचे अधिकारी विसरले. यादरम्यान, जोडरस्त्यावर अनेकांनी घरे बांधली आहेत. परिणामी, जोडरस्त्यासाठी जागाच शिल्लक राहिली नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने हा मार्गच रद्द केला आहे.
वरसोली खाडीपुलाने येथील पर्यटनाला चालना मिळेल, असे सांगितले जात होते, परंतु नियोजनशून्य कारभाराने शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. मागील २० वर्षांत अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी होऊन गेले, परंतु त्यांना जोडरस्त्यासाठी भूसंपादन करता आले नाही. कोकणात एखाद्या प्रकल्पासाठी भूसंपादन करणे किती कठीण आहे याचे हे मूर्तिमंत उदाहरण ठरले आहे, असे म्हणणे वरसोली मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष धर्मा यांचे आहे. वरसोली परिसरातील वाहतूक सुलभ करण्यासाठी तसेच कोळीवाडे, किनारी भाग आणि अलिबाग शहर यांना थेट जोडण्यासाठी हा पूल उभारण्यात आला होता. पुलाचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असले तरी दोन्ही बाजूंना आवश्यक असलेले अॅप्रोच रोडसाठी भूसंपादनच होऊ शकले नाही. परिणामी, पुलावरून कोणतीही नियमित वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. या प्रकल्पामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, मासळी वाहतूक जलद होईल आणि पर्यटकांसाठीही सुलभ मार्ग उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात पूल वापरात नसल्याने नागरिकांना आजही लांबचा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
सार्वजनिक निधीतून उभारलेला हा प्रकल्प दीर्घकाळ वापराविना राहणे ही गंभीर बाब असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. योग्य वेळी निर्णय घेतल्यास हा पूल परिसराच्या विकासाला नवी दिशा देऊ शकला असता. शासनाच्या नियोजनशून्य कारभाराचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
- मिलिंद कवळे, माजी सरपंच वरसोली ग्रामपंचायत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.