बालकर्करोग उपचार महागले

बालकर्करोग उपचार महागले
Published on

बालकर्करोग उपचार महागले
पात्र रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी, सीएसआरतून दोन लाखांचे अनुदान
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : बालकर्करोगाच्या उपचारांचा खर्च वर्षागणिक वाढत असून, नवीन थेरपी आणि औषधांमुळे आर्थिक ताणही वाढत आहे. पूर्वी एका मुलाच्या उपचाराचा सरासरी खर्च दोन लाख रुपये होता. आता हा खर्च पाच ते सात लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्‍यामुळे सरकारी अनुदानातून मिळालेला निधी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधी मोठा आधार ठरत आहे.
सध्या उपचारांसाठी सरकारच्या अनुदानासोबतच सीएसआर निधीचा समन्वय साधून प्रत्येक बालकर्क रुग्णाला मदत केली जाते. यापूर्वी सरकारी मदत ही निदान झाल्यानंतरच मिळत होती. मात्र निदानापूर्वीच्या तपासण्यांसाठी कोणताही निधी उपलब्ध नसल्याने कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि टाटा रुग्णालय समूह यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार झाला आहे. हा करार पहिल्यांदाच राबवण्यात येत असून, दारिद्र्यरेषेखालील पात्र मुलांना निदानापूर्व टप्प्यासाठी एक लाख आणि उपचारांसाठी एक लाख अशी एकूण दोन लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. १ एप्रिलपासून या योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे.
पूर्वी २००७-०८ दरम्यान सर्व तपासण्या २० ते २५ हजार रुपयांत व्हायच्या. पण आता याच तपासण्यांसाठी ८० हजार ते १.२० लाख रुपये खर्च येतो. यामध्ये रक्त तपासण्या, बोन मॅरो, सीटी स्कॅन, एमआरआय, पीईटी स्कॅन तसेच प्राथमिक औषधांचा समावेश असतो.

रुग्णासह कुटुंबालाही आधार
मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या मुलांना सहा महिने ते अडीच वर्षे वास्तव्य करावे लागते. यासाठी सुमारे ३० ते ४० स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मोफत निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या कोणत्याही वेळी ६०० ते ७०० मुले उपचार घेत असून, त्यांच्यासाठी तितक्याच केंद्रांची गरज आहे. उपचारांबरोबरच ‘सर्वसमावेशक सहाय्य मॉडेल’अंतर्गत निवास, प्रवास, अन्न व पोषण यावरही भर दिला जात आहे. २०१३ पासून सुरू केलेल्या मिड-डे मील योजनेत सुधारणा करून आता संपूर्ण कुटुंबाला पुरेल इतके अन्न दिले जाते. केमोथेरपीदरम्यान आवश्यक असणाऱ्या रक्त व प्लेटलेट्ससाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

एकूण नोंदणीकृत रुग्ण
वर्ष मुंबईबाहेरील केंद्रे टीएमएच (मुंबई)
२०२५ १,८८४ २,०१५
२०२४ १,७४३ २,१५६
२०२३ १,३८९ २,०६३

बालकर्करोग हा पर्यावरण किंवा जीवनशैलीवर अवलंबून नसल्यामुळे त्याचे प्रमाण वर्षानुवर्षे साधारण स्थिरच राहिले आहे. पूर्वी जितके रुग्ण आढळत होते तितकेच आजही आढळतात. मात्र सध्या निदानाची साधने अधिक सक्षम झाल्याने आणि उपचारासाठी पुढे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्या वाढल्याचे दिसते.
- डॉ. गिरीश चिन्नास्वामी,
प्रमुख, बालरोग ऑन्कोलॉजी विभाग, टीएमएच

मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर यांच्या संयुक्त प्रयत्नांतून आता निदानाच्या पहिल्याच दिवसापासून आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते. यातून गरीब कुटुंबांतील बालकर्क रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
- शालिनी जाटिया,
प्रभारी अधिकारी, इम्पॅक्ट फाउंडेशन, टीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com