शासकीय सेवकांबाबत नागरिक अनभिज्ञ

शासकीय सेवकांबाबत नागरिक अनभिज्ञ
Published on

शासकीय सेवकांबाबत नागरिक अनभिज्ञ
प्रशिक्षण कार्यशाळेतून धक्कादायक वास्तव्य समोर

विरार, ता. १५ (बातमीदार) : गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामपातळीवर सुमारे १५ विविध विभागांचे शासकीय कर्मचारी नियुक्त केलेले असतात. मात्र, यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांची साधी ओळखही ग्रामीण जनतेला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रमजीवी संघटना आणि विधायक संसद यांच्या वतीने आयोजित ‘ग्रामपंचायत व गाव कमिटी प्रमुख पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळेत’ हे प्रशासकीय अज्ञानाचे चित्र उघड झाले असून, सरकारी यंत्रणा आणि जनता यांच्यातील संवादाची मोठी दरी यानिमित्ताने स्पष्ट झाली आहे.

मंगळवार (ता. १४) आणि बुधवारी (ता. १५) उसगाव येथील संविधान सभागृहात पार पडलेल्या या दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेत विवेक पंडित, अध्यक्ष (मंत्री दर्जा) आदिवासी विकास आढावा समिती तथा श्रमजीवी संघटना संस्थापक यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थिंशी संवाद साधला असता ही आकडेवारी समोर आली. या कार्यशाळेत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, पशुधन पर्यवेक्षकांविषयी सुमारे दोन टक्के नागरिकांना माहिती आहे, तर कृषी सहाय्यकांविषयी सात टक्के, पेसा मोबिलायझरांविषयी नऊ टक्के, डेटा एन्ट्री ऑपरेटरांविषयी आठ टक्के आणि तलाठीविषयी सात टक्के शिबिरार्थींना माहिती आहे. याशिवाय बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (एमपीडब्ल्यू), आरोग्य विभागातील इतर कर्मचारी आणि कुपोषण निर्मूलनासाठी कार्यरत स्वयंसेवक असल्याचे प्रशिक्षणार्थीना माहितीसुद्धा नसल्याचे निदर्शनास आले.

ग्रामसेवकाची ओळख १०० टक्के प्रशिक्षणार्थींना असल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ दैनंदिन गरजांशी संबंधित असलेल्या आशासेविका (९६ टक्के), रास्त भाव दुकानदार (९० टक्के), शिक्षक (८१ टक्के) आणि पोलिस पाटील (८० टक्के) यांना लोक मोठ्या प्रमाणावर ओळखतात. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कामाशी संबंधित इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. अशा परिस्थितीमुळे गावपातळीवरील शासनाच्या अनेक सेवा प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याचे चित्र समोर आले आहे. सेवा देण्यासाठी कर्मचारी असले तरी त्यांच्या अस्तित्वाची माहिती नसल्याने, आरोग्य, शेती व पशुधन या मूलभूत क्षेत्रांतील योजनांचा लाभ मर्यादित राहतो आहे. कार्यशाळेत उपस्थित तज्ज्ञांनी ‘सेवा उपलब्ध असूनही माहितीअभावी नागरिक त्यापासून वंचित राहतात’ असे निरीक्षण नोंदवले. गावपातळीवर प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी प्रशासनाने आणि संघटनेनेसुद्धा प्रयत्न करावे, असे आवाहन विवेक पंडित यांनी या वेळी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com