शिंदे गटाचा ‘डॅमेज कंट्रोल’ फॉर्म्युला

शिंदे गटाचा ‘डॅमेज कंट्रोल’ फॉर्म्युला
Published on

शिंदे गटाचा ‘डॅमेज कंट्रोल’ फॉर्म्युला
गजानन पाटील यांना तालुकाप्रमुखपद देत नाराजीला आळा

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. १५ ः स्थायी समिती सभापतिपदाची संधी हुकल्यानंतर संभाव्य नाराजी टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून वेगाने ‘डॅमेज कंट्रोल’ करत नगरसेवक गजानन पाटील यांना कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुखपदी नियुक्ती देण्यात आली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रणनीतीचा हा भाग मानला जात असून, संघटनात्मक समतोल राखण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गजानन पाटील यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याच्या निर्णायक काळात ते देवदर्शनासाठी बाहेर गेल्याने त्यांची संधी हुकली. नवख्या चेहऱ्याला संधी देण्याचा विचार असतानाही पाटील अनुपस्थित राहिल्याने समीकरण बदलले. या पार्श्वभूमीवर पाटील यांना नाराज न ठेवता त्यांच्याकडे तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या स्वाक्षरीने नियुक्तिपत्र देण्यात आले असून, मंगळवारी (ता. १४) अधिकृतरीत्या ही घोषणा करण्यात आली.

कल्याण ग्रामीणमधील २७ गावांचा पट्टा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. या भागात संघटन मजबूत ठेवणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एकसंध ठेवणे, या दृष्टीने पाटील यांची निवड झाली असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक पातळीवर उभरते नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांचा कार्यकर्त्यांमध्ये चांगला संपर्क आहे. यापूर्वी प्रकाश म्हात्रे यांनी अनेक वर्षे तालुकाप्रमुखपद सांभाळत ग्रामीण भागात शिवसेनेचे जाळे मजबूत ठेवले होते. त्यानंतर महेंद्र पाटिल यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्या पक्षांतरानंतर हे पद रिक्त होते. त्यामुळे योग्य वेळी पाटील यांची निवड करत शिंदे गटाने संघटनात्मक पोकळी भरून काढली आहे.

दरम्यान, काटई येथील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सचिव नरेश पाटील यांनी या नियुक्तीचे स्वागत करत, “ग्रामीण भागाला हक्काचे नेतृत्व मिळाले असून, विकासकामांना गती मिळेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे. एकीकडे पद गमावलेल्या नेत्याची नाराजी टाळणे आणि दुसरीकडे संघटना बळकट करणे, या दुहेरी उद्देशाने केलेली ही नियुक्ती असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे ही केवळ नियुक्ती नसून आगामी राजकीय रणनीतीचा भाग असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com