अवघ्या दोन वर्षातच तयार केले रस्ते पुन्हा खोदले

अवघ्या दोन वर्षातच तयार केले रस्ते पुन्हा खोदले
Published on

तयार केलेले रस्ते अवघ्या दोन वर्षांतच पुन्हा खोदले
- ६०५ कोटींच्या रस्तेकामांवर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. १५ : ठाणे पालिका क्षेत्रातील रस्ते सुसज्ज व खड्डेमुक्त व्हावेत, या उद्देशाने मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी राज्य शासनाने दिलेल्या तब्बल ६०५ कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते तयार करण्यात आले होते. त्यामुळे ठाणेकरांना खड्डेमुक्त प्रवासाचा सुखद आनंद घेता येत आहे. असे असताना, अवघ्या दोन वर्षांतच रस्ते पुन्हा खोदले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे महापालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, शासन निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप मनसेने केला आहे.

राज्य शासनाने दिलेल्या निधीच्या परिपत्रकात स्पष्ट अट घालण्यात आली होती की, या योजनेअंतर्गत तयार करण्यात येणारे रस्ते खोदले जाणार नाहीत तसेच संबंधित रस्त्यांवर कोणतीही कामे केली जाणार नाहीत. मात्र, प्रत्यक्षात ठाणे शहरातील अनेक रस्ते पाणीपुरवठा विभागाकडून नव्या पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, हे रस्ते अद्याप दोषदायित्व कालावधीत असतानाच त्यांची दुर्दशा करण्यात आली आहे. महापालिकेच्या वतीने २०२२ मध्येच पाइपलाइन टाकण्याच्या प्रकल्पाचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना भविष्यातील कामांची कल्पना असतानाही रस्ते बांधकामावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. परिणामी, नव्याने तयार केलेले रस्ते अल्पावधीतच पुन्हा उकरले गेले आणि नागरिकांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे.

या प्रकारामुळे केवळ आर्थिक नुकसानच झाले नसून नागरिकांच्या दैनंदिन प्रवासावरही मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक कोंडी, धूळ आणि अपघातांचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात जिल्हाअधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप होत आहे. शासनाचा निधी वाया जात असताना जिल्हाअधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनसेच्या या आरोपावर ठाणे पालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा म्हणाले की,
अत्यावशक कामांसाठी रस्ते खोदण्याची परवानगी पालिकेच्या वतीने देण्यात येते. तसेच रस्त्याच्या मध्यभागी नाही, तर कडेला हे खोदकाम होत असल्याने मनसेने केलेल्या आरोपात काही तथ्य नसल्याचे सोनाग्रा यांनी सांगितले.

........................
प्रतिक्रिया :-
ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शासनाची फसवणूक केली असून, संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच आयुक्तांनी सर्व रस्त्यांची पाहणी करून सखोल चौकशी करावी.
- स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, मनसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com