

भिवंडी, ता. १५ (वार्ताहर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भूमिपुत्र एल्गार संघटनेने जयंती उत्सवावर अनावश्यक खर्च टाळत ठाणे व पालघर जिल्ह्यातील १३५ गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा अभिनव उपक्रम राबवला आहे. जयंतीनिमित्त मिरवणुका, डीजे आणि अनावश्यक खर्च टाळत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा निर्णय संघटनेने घेतला. त्यानुसार दुर्गम भागातील अनाथ, निराधार; तसेच मजूर कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील तब्बल १३५ अनाथ, निराधार आणि मजूर कुटुंबातील मुलांचे ''शैक्षणिक पालकत्व'' स्वीकारून संघटनेच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कृतिशील अभिवादन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद पवार यांनी दिली आहे. केवळ जयघोष करून बाबासाहेबांचे विचार जपले जात नाहीत, तर ते आचरणात आणणे आवश्यक आहे. शिक्षणाचा मंत्र प्रत्यक्षात उतरवण्यासाठीच आम्ही १३५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे, असे पवार यांनी सांगितले. या उपक्रमात युवा शक्ती प्रमुख रूपेश जाधव, नाशिक जिल्हा प्रमुख मुरलीधर कनोजे, राज्य उपाध्यक्ष कल्पेश जाधव, असगर पटेल, भूषण घोडविंदे, ॲड. सोनाली मनोरे-पवार, उपकार्याध्यक्ष दूषांत घायवट, विजय राऊत, प्रमिला तरसे, सुनीता वळवी यांच्यासह विविध तालुक्यांतील पदाधिकारी सक्रियपणे सहभागी झाले आहेत. समाजात शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत गरजू विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
विद्यार्थ्यांची पाहणी
योजनेत मोखाडा (३८), जव्हार (१८), डहाणू (२३), तलासरी (१५), पालघर (१५), भिवंडी (१०), वाडा (१०) आणि विक्रमगड (६) तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील लोणे, सरचिटणीस नवनाथ भोये, आदिम शक्ती प्रमुख स्वप्नील वाघ यांनी आपल्या पथकासह प्रत्यक्ष गावागावात जाऊन विद्यार्थ्यांची पाहणी केली. निवड प्रक्रियेत आई-वडील नसलेली, पालक गंभीर आजाराने ग्रस्त किंवा दिव्यांग असलेली मुले यांना प्राधान्य देण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन संघटनेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यापासून ते आवश्यक कागदपत्रांपर्यंत सर्व जबाबदारी स्वीकारली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.