कळव्यात बोगस तृतीयपंथीयांचा उपद्रव

कळव्यात बोगस तृतीयपंथीयांचा उपद्रव
Published on

कळव्यात बोगस तृतीयपंथींचा उपद्रव
खारेगाव-कळवा जोडणाऱ्या उड्डाणपुलाखाली संशयित हालचाली; नागरिकांमध्ये संताप

कळवा, ता. १५ (बातमीदार) : कळवा परिसरात बोगस तृतीयपंथींच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून, यावर तत्काळ कारवाईची मागणी होत आहे. खारेगाव व कळवा (पूर्व) यांना जोडणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपुलाखाली संशयास्पद पद्धतीने काही व्यक्ती तृतीयपंथी असल्याचे भासवून भीक मागण्याचा व्यवसाय करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पुलाखालील काही झोपड्यांमध्ये पुरुष व्यक्ती कपडे बदलून बाहेर पडतात आणि शहरातील विविध ठिकाणी, रेल्वे स्थानक, बाजारपेठ व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाऊन पैसे मागतात. या प्रकारामुळे नागरिकांची दिशाभूल होत असून, खऱ्या तृतीयपंथींवरही त्याचा परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत कळवा व खारेगाव परिसरातील झोपडपट्ट्यांची संख्या वाढली असून, रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे काही जण अशा मार्गांचा अवलंब करत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र, हा प्रकार कायदेशीरदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या अयोग्य असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत.

दरम्यान, तृतीयपंथी समाजातील काही प्रतिनिधींनीही या प्रकाराविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही जन्मतः किंवा परिस्थितीमुळे तृतीयपंथी झालो असून, प्रामाणिकपणे उपजीविका करतो. मात्र, बोगस व्यक्तींमुळे आमच्या समाजाची बदनामी होत आहे, असे मत कळवा (पूर्व) येथील तृतीयपंथी सिमरन यांनी व्यक्त केले, तर स्थानिक नागरिक सीतादेवी यादव यांनी सांगितले की, पुलाखाली काही पुरुष संशयास्पद हालचाली करताना दिसतात. नंतर ते तृतीयपंथी वेशात बाहेर येतात, हे पाहून आम्हाला धक्का बसला आहे.

दरम्यान, तृतीयपंथींच्या हक्कांबाबत देशात सकारात्मक बदल होत असताना अशा प्रकारांमुळे सामाजिक समतोल बिघडत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com