

वसईकरांच्या पायपीटला पूर्णविराम
नालासोपाऱ्यात नवे अप्पर तहसील कार्यालय
विरार, ता. १६ (बातमीदार)ः वसईतील तहसील कार्यालयामुळे अनेकांची गैरसोय होती होती. त्यामुळे तालुक्यासाठी नालासोपारा येथे नवीन अप्पर तहसीलदार कार्यालय होणार आहे.
आमदार राजन नाईक यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नवीन कार्यालयासाठीची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून, नालासोपारा येथे नवे अपर तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. श्रीप्रस्थ येथील शासकीय इमारतीत कार्यालय कार्यरत होणार असून, यामुळे वसईतील मुख्य तहसील कार्यालयावरील ताण कमी होणार आहे. महसूल विभागाने सुधारित आकृतीबंधाला मंजुरी देत वसईसाठी स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाला मंजुरी दिली आहे.
------------------------------
चार मंडळांचे कामकाज
श्रीप्रस्थ येथील शासकीय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सुरू करण्यात येणार आहे. नव्या कार्यालयात तालुक्यातील नऊ महसूल मंडळांपैकी चार मंडळांचे कामकाज होईल. नालासोपारा कार्यालयांतर्गत बोळिंज, विरार, आगाशी, मांडवी तर वसई तहसील कार्यालय क्षेत्रात वसई, कामण, पेल्हार, निर्मळ, माणिकपूर विभागाचे कामकाज चालणार आहे.
===================================
अप्पर तहसील कार्यलयाची जागा निश्चित झाली आहे. संबंधित गावाची अधिसूचना लवकरच जाहीर होऊन कामकाजाला सुरुवात होणार आहे.
-डॉ. दीपक गायकवाड, तहसीलदार, वसई