

फणस लागवडीकडे वाढता कल
बहुउपयोगी फळामुळे मिळतोय स्थिर उत्पन्नाचा आधार
विक्रमगड, ता. १६ (बातमीदार) : विक्रमगड तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पारंपरिक शेतीपद्धतीतून बाहेर पडत आधुनिक आणि प्रयोगशील शेतीकडे वळताना दिसत आहेत. बदलत्या हवामानाचा आणि बाजारपेठेच्या गरजांचा विचार करून शेतकरी नवनवीन पिकांचा अवलंब करत आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आंबा, काजू या पारंपरिक फळपिकांसोबतच फणसाची लागवड सुरू केली आहे. ज्यातून त्यांना मोठ्या प्रमाणात नफाही मिळत आहे.
विक्रमगडमधील शेतकरी सध्या यामध्ये मोगरा, सोनचाफा, झेंडू, सफेद कांदा, पपई यासारख्या पिकांबरोबरच आता फळपिकांकडे वळला असून, फणस लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. ओंदे, शीळ, देहर्जे, कुर्णझे, आलोंडे, मलवाडा या भागांमध्ये फणस लागवडीचे प्रमाण वाढत असून, यामुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन उत्पन्नाचा नवा मार्ग अवगत झाला आहे.
फणस या पिकाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी स्वतंत्र बाजारपेठ शोधण्याची आवश्यकता भासत नाही. ग्राहक थेट शेतात येऊन फळांची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना वाहतूक खर्च आणि बाजारातील चढउतार यांचा फारसा फटका बसत नाही. रस्त्याच्या कडेला विक्री केली तरी ग्राहकांची चांगली गर्दी होते.
सध्या बाजारात लहान फणसाला सुमारे १०० रुपये, तर मोठ्या फणसाला २०० रुपये भाव मिळत आहे. फणस हे तुलनेने कमी नाशवंत फळ असल्याने त्याची विक्री सुलभ होते. लागवडीनंतर साधारण सहा ते सात वर्षांनी फळधारणा सुरू होते. मात्र, योग्य नियोजन आणि पाण्याचे व्यवस्थापन केल्यास उत्पादन अधिक चांगले मिळते.
-------------
बहुपयोगी फळ
फणस हे केवळ फळ नसून भाजीपाला म्हणूनही मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. हिरव्या फणसाची भाजी, पिकलेल्या फणसाचे गरे, त्यापासून पोळ्या, वडे, लोणचे तसेच काही ठिकाणी आईस्क्रीमसारखे पदार्थ तयार केले जातात. फणसाच्या गऱ्यातील बिया भाजून किंवा उकडून खाल्ल्या जातात. तसेच त्यांची भाजीही बनवली जाते. फणसाच्या झाडाचे लाकूड टिकाऊ असल्याने घरबांधणी व फर्निचरसाठी वापरले जाते. झाडाच्या बाहेरील आवरणाचा उपयोग जनावरांच्या खाद्यासाठीही होतो. त्यामुळे फणस हे संपूर्णपणे उपयुक्त आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पीक ठरत आहे.
---------
कमी देखभालीत जास्त फायदा
फणस लागवडीसाठी विशेष मेहनत किंवा खर्च करावा लागत नाही. साधारण ८ ते १० महिन्यांच्या कालावधीत फळ तयार होते. एकदा झाड फळधारणा करू लागले की, अनेक वर्षे सतत उत्पन्न मिळत राहते, असे शेतकरी सांगतात. विक्रमगड तालुक्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीच्या चौकटीबाहेर पडून फणसासारख्या बहुउपयोगी आणि दीर्घकालीन उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळत आहेत. योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठेचा आधार मिळाल्यास फणस लागवड भविष्यात शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचे मजबूत साधन ठरू शकते.
--------------
फणसाच्या लागवडीसाठी जास्त मेहनत लागत नाही. कमी देखभालीत चांगले उत्पादन मिळते. एकदा झाड लागले की, अनेक वर्षे त्यातून उत्पन्न मिळते.
-बबन सांबरे, शेतकरी
-----------
आर्थिक उत्पन्न देणारी फळपिके घेतल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो. विक्रमगडसारख्या भागात आंबा, काजूसोबत फणसाला देखील चांगली मागणी आहे. भात शेतीसोबत फणस हे जोडपीक घेतल्यास शेतकऱ्यांची आर्थिक घडी मजबूत होऊ शकते
- गजानन पाटील, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.